Friday, September 11, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १० सप्टेंबर २०२६ - पर्जन्यखंडाचे संकट

संपादकीय : १० सप्टेंबर २०२६ – पर्जन्यखंडाचे संकट

जुलैत सर्वदूर हजेरी लावणार्‍या पावसाने ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. १ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ११ जिल्ह्यांत ३० दिवसांहून अधिक दिवस पावसाचा खंड पडला, तर चार महसुली विभागांमधील ८३ तालुयांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा पर्जन्यखंड नोंदवला गेला. मान्सूनचे आगमन, त्याने व्यापलेला प्रदेश आणि चार महिन्यांतील एकूण पाऊस यावर भारतीय शेतीचे भविष्य ठरते; पण आता एकूण पाऊस किती पडला यापेक्षा तो कधी व कुठे पडला, दोन पावसांमध्ये किती मोठा खंड होता आणि त्याचे समान वितरण झाले का, ही बाब अधिक महत्त्वाची ठरत आहे.

- Advertisement -

यंदा जुलैअखेर राज्यात पाऊस सरासरीपेक्षा आठ टक्के अधिक होता; परंतु ऑगस्टमध्ये चित्र पालटले आणि सरासरीपेक्षा ४६ टक्के कमी पाऊस झाला. ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण हंगामातील तूट १२ टक्क्यांवर पोहोचली असून, राज्यातील १७ जिल्हे २० ते ५० टक्के तुटीच्या वर्गात गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, येवला तालुयात ३७ दिवसांचा तर कळवण, देवळा तालुयात ३५ दिवसांचा खंड पडला आहे. मराठवाड्यात २६ दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने लातूर, बीड, धाराशिव, परभणीतील पिकांनी मान टाकायला सुरुवात केली असून, सोयाबीन उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रति हेटरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी होत आहे.

देशातील स्थितीही विस्कळीत असून, जूनमध्ये सुरुवातीनंतर २५ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला, तर ऑगस्टमध्ये पुन्हा १६ टक्क्यांहून अधिक तूट पडली. ८ सप्टेंबरपर्यंत देशातील पर्जन्य तूट सुमारे १३ टक्के होती. एप्रिलमध्ये मान्सून सुमारे ९२ टक्के राहण्याची शयता वर्तविली होती, ज्यामागे एल निनोचा धोका नमूद केला होता आणि तो आता दृश्यरूपाने समोर आला आहे. महाराष्ट्रात कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे आकडे राज्याची सरासरी सावरत असले तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्याचे वास्तव सुधारलेले दिसत नाही. सप्टेंबरमध्ये पावसात खंड पडल्यास संकटाची तीव्रता वाढणार आहे. या संकटाचे पडसाद राष्ट्रीयपातळीवरही उमटत आहेत.

खरीप हंगामात देशाच्या तांदूळ उत्पादनात सुमारे १४ लाख हेटरने घट झाली असून, एकूण तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. यंदा एल निनोमुळे अपेक्षित पाऊस न झाल्याने लागवड आणि उत्पादनावर परिणाम होऊन देशात एकूण उत्पादन १,४७० लाख टन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात तांदूळ लागवड क्षेत्रात १.०२ लाख हेटरची घट झाली आहे. असे असले तरी, केंद्र सरकारकडे ऑगस्टअखेर ६३९ लाख टन तांदळाचा साठा शिल्लक असून तो संरक्षित साठ्याच्या तुलनेत पाचपटीने जास्त आहे. त्यामुळे देशाची गरज भागून निर्यातीसाठी तांदूळ उपलब्ध राहणार असल्याने जागतिक बाजारात भारताचा दबदबा कायम राहण्याचा अंदाजही अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत खरीप पेरणी १.३६ कोटी हेटरवर झाली, जे प्रमाण ९५.१ टक्के आहे. गतवर्षी १.५२ कोटी हेटर क्षेत्र पेरणीखाली होते. कापसाचे क्षेत्र ३८.३७ लाख हेटरवर स्थिर असले, तरी ते पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा १० टक्के कमी आहे. मका, डाळींचे क्षेत्रही घटले. पेरणी होणे आणि पीक हातात घेणे भिन्न गोष्टी आहेत. पेरणीनंतर उगवण, फुलोरा, शेंगा किंवा बोंडे भरण्याच्या अवस्थेत पुरेसा ओलावा नसेल तर उत्पादन घटते. महाराष्ट्राच्या खरीप अर्थकारणातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका या पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसतो. विदर्भ-मराठवाड्यात पर्जन्य तूट व कर्जफेडीची अडचण यांचा परस्परसंबंध राज्यस्तरीय बँकर्स समितीनेही नोंदवला आहे. येथील सिंचन क्षमता सुमारे १४ टक्के असून राज्याची सरासरी २३ टक्के असल्याची समितीची नोंद आहे. वारंवार नुकसानीमुळे कर्ज परतफेडीची क्षमता घसरते. अशा बिकट वेळी शेतकर्‍यांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची ठरते.

या योजनेंंतर्गत खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकर्‍यांना केवळ दोन टक्के विमा हप्ता भरावा लागतो, तर उर्वरित हप्ता सरकार अनुदान म्हणून भरते. पेरणी न होणे, पीक उभे असताना पावसाचा खंड किंवा काढणीपश्चात नुकसान झाल्यास या योजनेद्वारे शेतकर्‍यांना विमारेषेचे संरक्षण मिळते. मात्र, नुकसान निश्चितीसाठी महिनोन्महिने पंचनाम्यांची प्रतीक्षा कालबाह्य ठरते. पावसाच्या पारंपरिक सरासरीवर उभी असलेली कृषी व्यवस्था नव्या हवामानात सुरक्षित राहणार नाही. टँकर सुरू झाल्यानंतर दुष्काळ नोंदवणारी व्यवस्था अपुरी आहे. ती बदलून पावसात खंड दिसू लागताच पीक, पाणी, चारा, कर्ज आणि रोजगार यांचे निर्णय घेणारी यंत्रणा उभी करावी लागेल. दुष्काळ आणि शेतीची रचना यावर प्रत्येक तालुयाचा जल आढावा ही त्याची सुरुवात असावी. योग्य नियोजन आणि आधुनिक उपायांच्या सहाय्यानेच या पर्जन्यतुटीच्या आव्हानावर मात करणे शय होणार आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...