Monday, October 19, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ११ जुलै २०२५ - प्रवेश प्रक्रियेची वैतागवाडी

संपादकीय : ११ जुलै २०२५ – प्रवेश प्रक्रियेची वैतागवाडी

अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मागे लागलेले अडचणींचे शुक्लकाष्ठ अजून संपायला तयार नाही. सुरुवातीला प्रवेश प्रक्रिया खंडित झाली होती. आता प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्याचे काम ठप्प झाले आहे. एकदम वापर वाढल्याने ताण येऊन सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण दोन्ही वेळेला सांगितले गेले. ते कारण खरेही असेल. पण तसे झाले तर निदान दाखले वाटप सुरु ठेवण्याचे अन्य पर्यायही तयार नाहीत.

परिणामी दाखल्यांसाठीच्या रांगा वाढत आहेत. ही अवस्था वादावादीला पोषकच नाही का? दरवर्षी तेच ते आणि तेच ते कसे घडते? गेल्या दोन तीन वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत रेंगाळल्याचे आढळते. वैतागलेले पालक आणि गोंधळलेले विद्याथी हे नेहमीचे चित्र झाले आहे. ते पाहाता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रवेशाची जुनीच पद्धत योग्य वाटायाला लागली असेल तर नवल नाही. प्रवेश घेणार्‍या आणि आरक्षणास पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले जमा करणे अपरिहार्य असते. त्यातील एक जरी कागद कमी असला तरी त्याचे दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होऊ शकतात. किती विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात याचा अंदाज असतो.

- Advertisement -

ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाल्यावर हजारो विद्यार्थी एकदमच त्याचा लाभ घेणार हे वेगळे सांगायला नको. ही सगळी किचकट परिस्थिती हाताळण्याची क्षमता असलेल्या संस्थेकडे काम सोपवणे ही यंत्रणेची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यात यंत्रणा अनुत्तीर्ण झाली आहे आणि त्याचा ताण मात्र विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागत आहे. अकरावीत प्रवेश हे दोन शब्द वाचण्याइतके विद्यार्थ्यांसाठी हे काम सोपे नसते. मनपसंत महाविद्यालय हवे असते. दाखले जोडले गेले नाही तर आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही याचा अंदाज नसतो. ठराविक वेळ गेली तर अर्ज पुन्हा भरावा लागतो. अनेक विद्यार्थी खासगी सायबर कॅफेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करतात.

प्रक्रिया रेंगाळली तर त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो तो वेगळाच. अन्याय झाला म्हणून एखादा विद्यार्थी न्यायलयात जाण्याची शक्यता नाकारली जाऊ शकेल का? अडनिड्या वयाच्या मुलांनी किती ताण सहन करायचा याला मर्यादा आहेत आणि तो का सहन करायचा हा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पातळीवर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जायलाच हवा. पण त्यामुळे प्रक्रिया गतिमान होणे अपेक्षित आहे. पण भविष्याचा वेध घ्यायला कमी पडलेल्या आणि चुकीतून काहीच न शिकण्याच्या यंत्रणेच्या बेफिकीर वृत्तीमुळे प्रवेश प्रक्रिया अधिक वेळखाऊ आणि किचकट बनत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२६ – डिजिटल व्यवहारांचे अर्थकारण आणि विश्वास

0
Daily Deshdoot Editorial 19 October 2026 भारताच्या डिजिटल क्रांतीने आर्थिक व्यवहारांचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आणि भाजीविक्रेत्यापासून नामांकित व्यापार्‍यापर्यंत सर्वत्र यूपीआय...