Wednesday, December 4, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ११ नोव्हेंबर २०२४ - हीच आमची प्रार्थना..

संपादकीय : ११ नोव्हेंबर २०२४ – हीच आमची प्रार्थना..

मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म मानला जातो. संत आणि समाजसुधारकांनी देखील त्याचा सातत्याने पुरस्कार केला. हा धर्म साहित्यिक आणि कवींना नेहमीच भुरळ घालतो. ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे कवी समीर सामंत म्हणतात. ‘माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्यविधाते’ असे वर्णन कवी वसंत बापट करतात.

सामाजिक कार्यकर्ता हा शब्द सर्वानी मिळून गुळगुळीत करून टाकला आहे. तथापि मानवता धर्म अनेकांचा जगण्याचा श्वास बनतो. ते हा धर्म खरोखर जगतात. अशी अनेक उदाहरणे अवतीभवती आढळतात. ठाण्याच्या काल्हेर गावात एक अनाथाश्रम आहे. 1993 साली तो सुरु झाला. योजना या त्याचा कर्त्यासवरत्या. त्या अनाथ आहेत. आश्रमातच वाढल्या आहेत. त्यामुळे अनाथांचे दुःख वेगळे समजावून घेण्याची गरज नव्हती असे त्या म्हणतात. त्यांचा आश्रम शेकडो लोकांचा आधार बनला आहे. ज्येष्ठ मंडळींची देखभाल कशी करायची याचे प्रशिक्षणही त्या युवांना देतात. मगच ते कार्यकर्ते प्रत्यक्ष काम करतात असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

- Advertisement -

समाजात माणुसकी राहिलेली नाही. मानवता धर्माचा लोकांना विसर पडला आहे. लोक आत्मकेंद्रित होत आहेत असे सरसकट बोलले जाते. ते काही अंशी खरेही आहे. तसा अनुभव देणार्‍या घटनाही घडतात. जे दिसते तेच खरे मानणे ही मानवी प्रवृत्ती मानली जाते. गुन्हेगारी, अहंकार, आत्मकेंद्रितता, भावनाशून्यता, वाढते बलात्कार, चोर्‍यामार्‍या समाजातील हीच बाजू प्रकर्षाने समोर येताना आढळते. त्यामुळे संपूर्ण वातावरण दूषित झाले आहे असा माणसांचा समज झाला तर त्यात नवल ते काय? तथापि ती नाण्याची एक बाजू म्हटली जाऊ शकेल.

आश्रम चालवणार्‍या योजनांसह असे अनेक कार्यकर्ते ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे. जी प्रकर्षाने समाजासमोर येण्याची गरज आहे. समाज एकसंघ ठेवणे, माणसांना माणुसकीच्या धाग्याने बांधून ठेवण्याची आवश्यकता कधी नव्हे इतकी आहे. कोणतेही सामाजिक काम स्थिरावण्यासाठी अनेक प्रकारे मदत केली जाऊ शकेल. ज्यांना ज्या मार्गाने असे काम करणे शक्य आहे त्यांनी ते करायला हवे. समाजातील निराधार, बेघर आणि मनोरुग्ण अशा अनेक गरजू लोकांना मदतीचा,आपुलकीचा हात देण्यासाठी माणसांनी पुढे येणे ही काळाची गरज म्हटली जाऊ शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या