Thursday, May 21, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ११ नोव्हेंबर २०२५ - स्वस्थ मातेचे महात्म्य

संपादकीय : ११ नोव्हेंबर २०२५ – स्वस्थ मातेचे महात्म्य

भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक जिंकताना केलेल्या पराक्रमाचे विजयाचे कवित्व, त्यांचे सत्कार आणि मुलाखतींच्या रूपाने अजून सुरूच आहे. त्यात सगळ्याच खेळाडू त्यांचे एक मत जोरकसपणे मांडतात. महिला संघाचा विश्वचषकी विजय देशातील महिला क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारक आणि आमूलाग्र बदल घडवेल. हा विजय मुलींना खेळण्यासाठी प्रवृत्त करेल. खेळातदेखील उज्ज्वल भविष्य असते हे त्यांच्याही लक्षात येईल, यावर प्रशिक्षकांसह सगळ्या खेळाडूंचे एकमत आढळते. ती ताकद या विजयात आहेच. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी या खेळाडूंनी किती प्रचंड मेहनत घेतली हे त्यांच्या प्रशिक्षकांनी पंतप्रधानांना सांगितले.

- Advertisement -

संघातील काहींनी विपरीत परिस्थितीशी तर काहींनी मानसिक विकारांशी सामना केला आणि लक्ष्य साध्य केले याच्या अनेक ध्वनीचित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत आहेत. त्यापासून खेळाडू, खेळू इच्छिणार्‍या मुली आणि त्यांचे पालक, त्यांचे प्रशिक्षक तर प्रेरणा घेतीलच पण त्या भावनेचा एक धागा सामान्य महिलांना देखील त्यांच्याशी जोडू शकेल. आरोग्य राखण्याची प्रेरणा महिला त्यांच्यापासून घेऊ शकतील. सामान्य महिलांमधील वाढते अनारोग्य ही गंभीर सामाजिक समस्या आहे. महिलांना केंद्रीभूत ठेवून राज्य सरकार अधूनमधून महिलांची आरोग्य तपासणी करणारे उपक्रम घेते. किंवा ‘वुमन हेल्थ इंडेस’ सारखे सर्वेक्षण जागतिक पातळीवर राबवले जाते. त्यांचे निष्कर्ष तीच समस्या अधोरेखित करतात. महिलांमध्ये हृदयविकार, कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता यांच्या संसर्गाची प्राथमिक आणि काहींमध्ये दुर्दैवाने दुसर्‍या टप्प्यातील लक्षणे ‘अ‍ॅनिमिया’ ही अनेक महिलांच्या बाबतीत सामान्य बाब आढळली.

अ‍ॅनिमिया हा अनेक रोगांच्या संसर्गाला पोषक ठरू शकतो. स्वआरोग्याच्या बाबतीत महिला त्यांना गृहीत धरतात आणि दुर्लक्ष करतात ही खरी मूळ समस्या आहे. ज्याकडे कसे बघायचे हे महिला खेळाडूंनी अप्रत्यक्षपणे सांगितले. वेळोवेळी येणारे मानसिक आणि भावनिक चढउतार खेळाडूंनी स्वीकारले. एवढेच नव्हे तर जाहीरपणे मनमोकळेपणे सांगितले. त्यावर चर्चा केली. कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी तिचा स्वीकार ही पहिली पायरी असते. इथेच बहुसंख्य सामान्य महिलांचे घोडे पेंड खाते. कुटुंबाचे आरोग्य राखण्याची जबाबदारी त्या घेतात, त्याच उत्साहाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. अनेकींना हे कळते पण वळत नाही. आरोग्याचे महत्त्व तज्ज्ञही सुचवतात. प्रबोधन करतात. व्यायाम शिकवतात. पण कामांच्या धबडग्यात ‘वेळ नाही’ हे पालुपद बहुसंख्य जणी आळवतात किंवा क्वचित तसे अभिमानाने सांगतात देखील. दैनंदिन वेळापत्रकातील त्यांच्या अनेक सवयी आरोग्याला पोषक नसतात. बहुसंख्य जणी दुखणे अंगावर काढताना आढळतात. किंबहुना महिलांना तसे करावेच लागते अशीच धारणा आढळते. त्रासच होत नाही मग कशाला आरोग्य चाचण्या करायच्या अशीच मानसिकता असते.

व्यायामाबाबतही असे गैरसमज कौतुकाने बाळगलेले आढळतात. दिवसभर घरात राबतो मग वेगळा व्यायाम कशाला हवा अशीच समजूत असते. घरात काम करणे हा व्यायाम नाही हे बहुसंख्य महिलांना पटत नाही. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये देखील अशा उणीवा आढळतात. उदाहरणार्थ, शिळे अन्न महिलाच खातात. पण हीच मानसिकता त्यांच्यातील वाढत्या अनारोग्याचे एक कारण बनत चालली आहे. सर्वेक्षणांचे निष्कर्ष तिकडेच अंगुलीनिर्देश करतात. पण महिलांनी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा हेच खेळाडू सुचवतात. त्यासाठी एक व्यक्ती म्हणून महिलांनी स्वतःकडे बघण्याची आवश्यकता आहे हेच त्या सुचवतात. एकदा का तशी मानसिकता विकसित झाली की सर्वांगीण दृष्टिकोन बदलण्याची ती सुरुवात ठरू शकेल.

कुटुंबातील सदस्य म्हणून कदाचित त्या स्वतःची गणना करू शकतील. आरोग्याला महत्त्व द्यायला शिकू शकतील. ते राखण्यासाठी वेळच काढावा लागतो हे त्यांना पटू शकेल. खेळाडूंच्या वाट्याला आलेल्या कौतुकामुळे मुलींनी खेळाकडे वळावे अशी भावना निदान काही जणींच्या तरी मनात निर्माण झाली असेल. पण मुलींना खेळाडू म्हणून घडवण्यासाठी त्यांची आई देखील तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. मुलगी असो अथवा मुलगा, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा पाया, कुटुंबाचे आरोग्य आणि सकारात्मक वातावरणात दडलेला असतो. एक स्वस्थ आई मुलींच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकते, हाच संदेश महिला खेळाडूंनाही समाजाला द्यायचा असावा.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...