माणूस जमीन निर्माण करू शकत नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. तथापि माणूस वारसा म्हणून मिळालेल्या मातीचे संवर्धन मात्र नक्कीच करू शकतो. तीच जाणीव रुजवण्यासाठी ‘जागतिक माती दिवस’ साजरा केला जातो. माती वाचवण्याची चळवळ चालवली जाते. माती कसदार असली तर शेती जोमदार होते. पशुधन पोसले जाते. औषधी वनस्पती दर्जेदार उगवतात. मातीचीच धूप कमी होते. पाणी साठवण क्षमता वाढते. अन्नसुरक्षा अबाधित राहू शकते. असे एक ना अनेक फायदे सांगितले जाऊ शकतात.
मातीचा पोत का सांभाळला पाहिजे हे आता माणसांना वेगळे सांगायला नको. ते मनावर ठसवणार्या घटना अधूनमधून उघडकीस येतात. बुलढाण्यातील शेगाव आणि नांदुरा हे तालुके मध्यंतरी अचानक चर्चेत आले. या तालुक्यातील काही गावांमध्ये माणसांना अचानक टक्कल पडायला लागले होते. केस हा माणसांच्या अती जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे या केसगळतीची किती दहशत पसरली असेल हे समजण्यासारखे आहे. या घटना म्हणजे संशोधकांना आव्हानच होते. अनेक अनुमाने व्यक्त केली गेली. पद्मश्री डॉ. हिंमतराव बाविस्कर यांनीही एक निष्कर्ष व्यक्त केला. तो माती प्रदूषणाकडे लक्ष वेधून घेऊ शकेल. टक्कल पडलेल्या व्यक्तींच्या मूत्र, रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचे प्रमाण त्यांच्या मानकापेक्षा खूप जास्त आणि झिंकचे प्रमाण कमी आढळले.
धान्यात झिंकचे प्रमाण कमी तर मातीत माती, कोळसा आणि राखेत फॉस्फरसचे प्रमाण खूप जास्त आढळले. लोकांनी शेतजमिनीत फॉस्फेटचा जास्त वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केल्याचे सविस्तर वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील भूजलात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले आहे. रासायनिक खतांचा वाढता वापर हे त्याचे एक कारण सांगितले जाते. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक गुणवत्ता अहवालात हा निष्कर्ष नमूद आहे. अशा पाण्याच्या वापरामुळे पोटाचा कॅन्सर, ब्लु बेबी सिंड्रोम, जन्मजात व्यंग, रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होणे असे परिणाम होऊ शकतील. मातीचा पोत बिघडला तर मानवी आरोग्यावर त्याचे किती गंभीर परिणाम संभवतात हे जाणवून देण्यासाठी हा दोन घटना पुरेशा ठरू शकतील.
मातीचे पोषण चक्र माणसाने अबाधित राखले पाहिजे याकडे जागतिक संशोधक लक्ष वेधतात. यावर तज्ज्ञ उपायही सुचवतात. मातीच्या नमुन्यांची नियमित तपासणी, त्याआधारे पिकांची निवड-खत आणि पाणी नियोजन हे त्यापैकी काही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे प्रभावी व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे, असे संशोधक म्हणतात. सामान्य माणसे देखील त्यात सहभागी होऊ शकतील. त्यांनी फक्त कचर्याचे व्यवस्थापन जरी केले तरी ते साहाय्यभूत ठरू शकेल. माती संवर्धनाचे आव्हान जटिल आहेच. पण अनेक युवा शेतकरी ते पेलण्याचे सामर्थ्य कमावत आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक युवा शेतकर्यांचा त्यात समावेश आहे. मातीचा र्हास थांबवून फायद्याची शेती करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हे चित्र आशादायी आहे.