सध्या राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये सांस्कृतिक महोत्सवाची आणि क्रीडा स्पर्धांची धूम सुरु आहे. साधारणतः डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यांची मुले आतुरतेने वाट पहातात. हेच दोन महिने त्यांना ‘हासर्या मुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी’ याची अनुभूती देतात. शाळेचे हे वर्णन प्र.के.अत्रे यांच्या ‘माझी शाळा’ या कवितेतील आहे. ‘मज आवडते ही मनापासूनी शाळा’ ही भावना निर्माण होण्यात या दोन महिन्यात चालणारे विविध उपक्रम मोलाची भूमिका बजावत असावेत.
नृत्य, नाट्य, संगीत, खेळ, कला आणि विविध स्पर्धा असा या काळात शाळांमधील माहोल असतो. अभ्यास झाला का रे, या प्रश्नाची जागा कोणत्या स्पर्धेत भाग घेतला रे हा प्रश्न घेतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उप्रक्रम आवश्यक असतात. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या क्षमतेचा असतो. त्या क्षमतांची चुणूक अशा उपक्रमात दिसते. एखादा पेंटिंग चांगले काढू शकेल. एखादा खेळात माहीर असू शकेल. एखाद्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे असू शकेल. एखाद्याचा पदन्यास मंत्रमुग्ध करणारा असू शकेल.
मुलांमधील वेगवेगळ्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा विकास हाच या महोत्सवांमागचा उद्देश असतो. निदान तसे सांगितले तरी जाते. त्यातील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. महोत्सवात मुले निर्लेप मनाने एकमेकांमध्ये मिसळतात. संवाद साधतात. एकमेकांना मदत करतात. प्रसंगी सांभाळून घेतात. जो चांगले प्रदर्शन करेल त्याचे कौतुकही करतात यालाच संघभावना म्हणत असावेत. यातून शिस्त शिकतात. वेळेचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसते. ते मंचावर जाण्याचे धाडस करतात. समयसूचकता अंगी बाणते. ही मूल्ये भविष्याचा, आव्हानांचा आणि संकटांचा सामना करण्यासाठी गरजेची असतात. मुले त्यांचे भविष्य घडवू शकतील अशी विविध क्षेत्रे या महोत्सावांमुळे पालकांसमोर खुली करतात.
कारण मुलांमधील विविध कौशल्यांचा परिचय याच काळात शिक्षक आणि पालकांना होत असतो. आगामी काळ बहुविविधतेचाच मानला जातो. करिअरची नवनवीन क्षेत्रे उदयास येत आहेत. त्याची दिशा मिळण्यात असे महोत्सव मदत करतात. महोत्सव भलेही दोन महिन्यांपुरते मर्यादित असतात. पण त्या दरम्यानचे निरीक्षण आणि आकलन महत्वाचे ठरू शकेल. यशस्वी वाटचालीची काही मुळे शाळेत दडली असल्याचे आवर्जून उल्लेख अनेक यशस्वी व्यक्ती करताना आढळतात.
विकासाच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका मात्र अपरिहार्य ठरू शकेल. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमोर प्रांजल जाधव हिने केलेल्या जोरदार भाषणाची माध्यमांनी दखल घेतली. तिची तयारी निःसंशय तिच्या शिक्षकांनी करून घेतली असावी. शिक्षक शालेय प्रगतीसाठी बांधील असतात. तथापि पालकांच्या मदतीने चुणूकदार विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचा आराखडा तयार केला जाऊ शकेल. तो राबवण्यासाठी पालकांना प्रेरित केले जाऊ शकेल. तसे घडू शकले तर महोत्सवाचा खरा उद्देश साध्य होऊ शकेल.