राज्याच्या आणि नाशिकच्या प्रशासनाला कुंभमेळ्याचे वेध लागले आहेत. नाशिकचा कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. पण सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेला महापर्व कुंभ चर्चेत आहे. कुंभमेळा आणि त्याचे विविध आयाम याविषयी मतमतांतरे असू शकतील. तथापि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवाढव्य सोहळा भाविकांसाठी सुकर करण्याच्या प्रशासनाच्या हायटेक दृष्टिकोनाबाबत मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमत आढळते.
पन्नास कोटी भाविक यादरम्यान प्रयागराजला भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पहिले शाहीस्नान पार पडले आहे. त्यातून नियोजनाचा अनुभव भाविकांना आल्याचे सांगितले जाते. प्रचंड गर्दी, शाहीस्नाने, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, नदीचे आरोग्य, विदेशी पर्यटक, महाकुंभमेळ्यातून निर्माण होणारे रोजगार आणि राज्याला मिळणारा काही हजार कोटींचा महसूल व दुसर्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल का याचा वेध, भयंकर घटना घडू शकण्याचा धोका, हरवणारी व सापडणारी माणसे या व अशा अनेक पातळ्यांवर प्रशासनाने मानवी क्षमतेसह तंत्रज्ञानाची मदत घेतलेली आढळते.
महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेश मागासलेले राज्य मानले जाते. तिथली लोकसंख्येची घनता देखील जास्त आहे. त्या राज्याला हे शक्य होऊ शकले. संपूर्ण प्रयागराजमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त कॅमेरे बसवले गेल्याचे आणि सगळ्या प्रवेश आणि बाहेर जाणार्या रस्त्यांवर विशेष लक्ष असल्याचे सांगितले जाते. पाण्याखाली तरंगणारे ड्रोन, अडचणीच्या ठिकाणी देखील तातडीने पोहोचून आग विझवू शकतील अशा वेगवान अग्निशमन दुचाकी, कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा पुरवठा करू शकेल अशी यंत्रणा, अत्यंत वेगवान बोटी, अत्याधुनिक आरोग्य कक्ष, हरवलेल्या व्यक्तीना शोधून देणारे अत्याधुनिक कक्ष इत्यादी सोयीसुविधा विशेष चर्चेत आहेत. हरवलेल्या माणसांच्या कक्षात मुलांना खेळण्याची जागा, आहार आणि आरामाची सोय केलेली आढळते.
सार्वजनिक ठिकाणी जागोजागी अन्नछत्र चालवले जात आहेत, परिणामी एकाही भाविकाला उपाशी परत जावे लागणार नाही असे त्यांच्या काही अधिकार्यांनी माध्यमांना सांगितले. प्रयागराजला विस्तीर्ण घाट आहेत आणि जागा मुबलक आहे असा मुद्दा हिरीरीने मांडला जातांना आढळतो. तो दखलपात्र असूही शकेल. पण मूळ मुद्दा आहे तो नवयुगातील कुंभमेळ्याच्या नियोजनाचा, आयोजनाचा आणि तो सोहळा जागतिक मानदंड ठरू शकेल याच्या जाणिवेचा. ती असली तर बारीकसारीक मुद्यात आणि प्रत्येक पातळीवर त्याचे प्रतिबिंब उमटते. जसे तर प्रयागराज कुंभमेळ्यात आणि पर्यायाने माध्यमाच्या वार्तांकनात दिसते. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या महापर्वाच्या आयोजनाकडे पाहिले जाऊ शकेल का?