Saturday, April 4, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : १७ फेब्रुवारी २०२६ - जे दिल्लीत तेच गल्लीत

संपादकीय : १७ फेब्रुवारी २०२६ – जे दिल्लीत तेच गल्लीत

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात झालेल्या हाणामारीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे? लांच्छन, अप्रतिष्ठा, अशोभनीय, अनैतिक, तत्त्वहीन असे शब्ददेखील अर्थहीन ठरावेत अशीच ती घटना आहे. वास्तविक, हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष. एक देशव्यापी सत्ताधारी- ‘पार्टी विथ द डिफरन्स’ अशी ओळख मिरवणारा आणि दुसरा शतकी इतिहास असलेला. तथापि तो लौकिक धुळीस मिळवायचेच या पक्षांनी ठरवले असावे का? दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. रक्तबंबाळ केले. गाड्या फोडल्या. मुद्याची लढाई गुद्यांनी लढलेल्या कार्यकर्त्यांचे कान त्यांच्या नेत्यांनी निदान हा मजकूर लिहून होईपर्यंत तरी उपटले नव्हते.

याचाच अर्थ, कार्यकर्त्यांचे हे अशोभनीय वर्तन त्यांच्या नेत्यांनाही मान्य असू शकेल का? ज्या पक्षांनी राजकीय कार्यकर्त्यांना सामाजिक वर्तनाचे धडे घालून देणे जनतेला अपेक्षित आहे, त्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस बघत राहण्याची वेळ लोकांवर आली आहे. अर्थात, बहुसंख्य निवडणुका पार पडल्या आहेत. काही दृष्टिपथात आहेत; पण अजून वेळ आहे. मतदारांची पाच वर्षांतून एकदाच गरज भासते. त्यामुळे मतदारांना काय वाटते याची फिकीर किंवा पक्षाच्या प्रतिमेची काळजी राजकीय पक्षांनी तरी का करावी, हाही प्रश्नच आहे. उपरोक्त घटनेचा दोष कार्यकर्त्यांना तरी का दिला जावा? सध्या संसदेत तरी दुसरे काय सुरू आहे? जे कार्यकर्त्यांचे नेते मानले जातात ते संसदेत गोंधळच घालताना आढळतात. ज्या सभागृहात गंभीर चर्चा होणे अपेक्षित असते, जिथे असामाजिक वर्तनाला आळा घालण्यासाठी कायदे केले जातात, त्या सभागृहाची प्रसंगी अप्रतिष्ठा करण्यात सगळेच पक्ष आघाडीवर आढळतात.

- Advertisement -

तिथेही मुद्यांची लढाई गुद्यांनीच लढली जाताना जनता आणि कार्यकर्ते पाहतात. त्यामुळे तेच वर्तन योग्य आहे असे कार्यकर्त्यांना वाटू लागले तर त्याचा दोष त्यांना कसा दिला जाऊ शकेल? संसदेच्या एका मिनिटाच्या कामकाजासाठी सरकारला किती पैसे खर्च करावे लागतात याचे आकडे माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होतात. आपण जनतेचा पैसा वाया घालवत आहोत याची फिकीर बहुसंख्य पक्षांना नसते. मग रस्त्यावरच्या आंदोलनांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तथाकथित कार्यकर्त्यांच्या रोषाला सार्वजनिक संपत्तीच बळी पडते.

संसदेत कामकाज न होऊ देणे नेत्यांना गैर वाटत नसेल तर सार्वजनिक संपत्तीची हानी करण्यात कार्यकर्ते तरी मागेपुढे कशाला बघतील? वरती तेच खाली पाझरते असे म्हटले जाते ते हेच. राहता राहिला प्रश्न महापुरुष आणि राष्ट्रपुरुषांबद्दल अपशब्दांचा. तसे करणे सर्वार्थाने गैरच आहे. कारण त्यांनी त्यांच्या कार्याने आणि विचारांनी लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. महापुरुष आणि राष्ट्रपुरुषांचे विचार अंमलात आणून ते स्थान कायम राखणे हेच खरे त्यांचे स्मरण ठरू शकेल. त्यांचे विचार निर्धाराचे, लढण्याचे बळ देतात. माणुसकीचे संस्कार करतात. तौलनिक विचारशक्ती पुष्ट करतात.

योग्य वाटेवर चालायला प्रवृत्त करतात. त्यांच्या विचारांची आणि समाजहितैषी मूल्यांची समाजाला कधी इतकी गरज आहे. पण तसे करायची किती राजकीय पक्षांची मनापासून तयारी असू शकेल? कारण विचारांची अंमलबजावणी सोपी नसते. ती सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी निर्धार, विचारांवरचा ठाम विश्वास आणि निर्धाराची आवश्यकता असते. किती राजकीय पक्षांकडे तेवढा वेळ असू शकेल किंवा असतो? सत्तेची गणिते जुळवण्यासाठी महापुरुषांचा आधार सगळेच पक्ष घेताना आढळतात. ती बहुसंख्य राजकीय पक्षांची अपरिहार्यता असू शकेल. ज्यांनी भेदाभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता स्वार्थासाठी राजकीय पक्ष महापुरुष, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांची जातीपातीत वाटणी करण्यासही पक्ष मागेपुढे पाहत नाहीत.

वास्तविक त्यांनी व्यापक विचारांचीही देणगी समाजाला दिली. त्या अर्थाने सगळे महापुरुष आणि राष्ट्रपुरुष समाजाला आदरणीय आणि अनुकरणीय आहेत. याचेही भान सर्वांचेच पुरते सुटले असावे. त्यामुळे अधूनमधून वाद झडतात आणि त्याला शाब्दिक फोडण्याही घातल्या जातात. पुण्यातील धुमश्चक्री हे त्याचेच उदाहरण ठरू शकेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणार्‍या भारतात राजकीय पक्षांचा प्रवास हळूहळू कोणत्या दिशेने सुरू आहे याचे पुणे घटना द्योतक ठरू शकेल.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०४ एप्रिल २०२६ – बंगालमधील झुंडशाही

0
पश्चिम बंगालमधील कालीचक येथे घडलेली घटना लोकशाही व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या सात न्यायालयीन अधिकार्‍यांना तब्बल नऊ तास संतप्त...