
नवी दिल्ली | New Delhi
काल (मंगळवारी) रात्रीपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे सेनचे ९ पैकी ६ खासदार शिंदे सेनेत (Shinde Shivsena) जाणार असल्याने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी काल (मंगळवारी) दिल्लीत हजेरी लावली होती. यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले होते. यात त्यांनी आपल्या गटाला मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता त्यांच्या गटाला मान्यता मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी या फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता दिली असून, ते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले आहे. तर या घडमोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तातडीने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या भेटीला पोहचले आहेत. या गटाला मंजूरी देण्यापूर्वी उद्धव सेनेची बाजू ऐकून घेण्यासाठीची विनंती ते करणार असल्याचे बोलले जाते.
हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले
दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार (MLA and MP) संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे समजते.
कोणत्या खासदारांच्या गटाला मान्यता
संजय जाधव (परभणी) संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम) नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) ओमराजे निंबाळकर (धाराशिव) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)




