विज्ञानाची एक शाखा मानली जाणारी कृत्रिम बुद्धिमता सध्या जगभर चर्चेत आहे. तिच्या वापरामुळे रोजगारांवर गदा येण्याची भीती लोक व्यक्त करतात. तथापि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सशक्त समाजनिर्मिती आणि मानवतेसाठी कसा करून घेतला जाऊ शकेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात अधोरेखित केले. पॅरिस येते नुकतीच एआय कृती शिखर परिषद पार पडली. या परिषदेचे सहअध्यक्षपद मोदींनी भूषवले. सायबर सुरक्षा, डीपफेक, चुकीच्या माहितीचा प्रसार यावर नियंत्रणासाठी देशांनी एकत्र यावे, तंत्रज्ञानाचा जनताकेंद्री दृष्टिकोन सर्वांनी मिळून तयार करावा, असेही ते म्हणाले.
कोणत्याही तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होत नाहीत असे सांगून लोकांना आश्वस्त केले. मात्र रोजगाराचे स्वरूप बदलते. नव्या संधी निर्माण होतात. त्या प्रकारची कौशल्ये माणसांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सुचवले. त्यातील मतितार्थ लक्षात घेतला जायला हवा. आरोग्य, शिक्षण, कृषी, गरिबी अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या सतावतात. त्यावर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून घेतला जाऊ शकेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्यांचे निराकरण उत्तम पद्धतीने केले जाणे शक्य आहे. अशाच एका सामाजिक समस्येकडे महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही अंगुलीनिर्देश केला.
गर्दीचे नियंत्रण आणि लोकांची सुरक्षितता यावर अभियंत्यांनी काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. अनियंत्रित गर्दी माणसांसाठीच किती जीवघेणी ठरू शकते याचा अनुभव समाजाला नेहमीच येतो. असेच अन्य क्षेत्रांबद्दलदेखील म्हटले जाऊ शकेल. त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना केल्या जाऊ शकतील. लोकोपयोगी तांत्रिक आविष्काराची अशी अनेक उदाहरणे सांगितली जाऊ शकतील. उदाहरणार्थ, लहरी हवामानाचा शेतकर्यांना फटका बसतो. त्यावर उत्तर शोधले जाऊ शकेल. शेतकर्यांना त्याची आत्यंतिक गरज आहे.
कोट्यवधी लोकांच्या खात्यात थेट रक्कम जमा होते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसू शकला. एका क्लिकवर बाजारातील कोणतीही वस्तू घराच्या दारात येते. एकाकी व्यक्तींचे जगणे त्यामुळे सुकर होत असू शकेल. देशातील युवा सर्जनशील आहेत. त्यांना सामाजिक समस्यांची जाणीव आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी एआयसारख्या किंवा सर्वप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक जण अॅप बनवतात. लोकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतात. तंत्रज्ञानाला मानवी चेहरा बहाल करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी त्यामुळे माणूस कधीही बिनकामाचा ठरणार नाही हेच मोदी यांना सुचवायचे असावे.