Wednesday, February 4, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १८ जून २०२५ - संघर्ष निवळेल का?

संपादकीय : १८ जून २०२५ – संघर्ष निवळेल का?

इराण आणि इस्त्रायल या दोन देशांत संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान वातावरण चांगलेच चिघळले आहे. दररोज हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेत तणाव वाढतच आहे. गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेला या दोन देशांतील संघर्ष वाढतच गेला तर काय होईल? या प्रश्नाने जगातील अनेक देश अस्वस्थ आहेत. इस्रायल अणुबॉम्बधारी देश आहे. अणूबॉम्ब असलेल्या देशांतील युद्ध तीव्र होत जाण्याची किंमत जगाला मोजावी लागते. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या नेतृत्वाने संयम बाळगावा, असे आवाहन जगातील अनेक देश करीत आहेत.

मध्यंतरी दहशतवादी हल्ल्यांवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष निर्माण झाला तेव्हाही अनेक देशांनी संयमाचे आवाहन दोन्ही देशांना केले होते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना आणि मदत क्रमांक जाहीर केले आहेत. इस्रायल-इराण संघर्षाचे भारतावरही अनेक परिणाम संभवतात. युरोप, अमेरिका आणि कॅनडाचा विमान प्रवास महाग होऊ शकेल. कच्च्या तेलाच्या किमती वाढत्याच राहतील. भारतीय चलन रुपया कमकुवत होऊ शकेल. आखाती देशांत सुमारे एक कोटी भारतीय काम करतात. त्यांच्या रोजी-रोटीवर, पर्यायाने ते भारतात पाठवत असलेल्या आर्थिक मदतीवर परिणाम संभवतो. हजारो विद्यार्थीही तेथे शिकतात.

- Advertisement -

दोन्ही देशांतील संघर्ष थांबावा, असे जगाला वाटत असले तरी महासत्तेला अर्थात अमेरिकेला तसे वाटते का? अमेरिकेचे शत्रू आणि मित्र सारखे बदलतात. कोणालाच ते कायमचा शत्रू अथवा मित्र मानत नाहीत. त्यामुळे यावेळीदेखील अमेरिकेच्या करणी आणि कथनीतील फरक जगाच्या अनुभवास येईल. अध्यक्ष ट्रम्प यांनी जी-७ परिषद अर्ध्यावर सोडली. एकीकडे त्यांनी या परिषदेने दोन देशांत सुरु असलेला संघर्ष निवळावा म्ह्णून तयार केलेल्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्याचवेळी इराणसोबत अणुकरार करण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला कतारमधील अमेरिकेच्या हवाईतळावरून इस्रायलची लढाऊ विमाने इंधन भरतात.

YouTube video player

पाकिस्तान, तुर्की, कतार, येमेन, ओमान या मुस्लिम देशांनी इराणला पाठिंबा दिला आहे. इस्त्रायलच्या वाढत्या आक्रमकपणामुळे मुस्लिम जग एकवटण्याची प्रक्रिया सुरु झाली, असा याचा अर्थ यातून काढला जाऊ शकेल. अशावेळी भारत कोणती भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात भारताला उघड पाठिंबा देणारा इस्त्रायल हा पहिला देश होता. इस्रायल-इराण यांच्यातील चिघळत्या परिस्थितीत तणाव कमी करण्यासाठी भारत भूमिका बजावू शकेल, अशा आशावाद इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी नुकताच व्यक्त केला. आजपर्यंत तरी भारताने तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. युद्ध चिघळायला नको, अशी जागतिक भावना असली तरी इस्त्रायल ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई मानतो. त्यामुळे तूर्तास तरी शांतता निर्माण होण्याची कोणतीही चिन्हे दृष्टीपथात नाहीत.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...