मुंबई | Mumbai
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार कंटेनरखाली घुसली. या अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या भीषण अपघाताने आता अशोक खरातचा एन्काऊंटर होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी याविषयीचे ट्वीट केले आहे, त्यावरून खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. अनेक दिवसांपासून अनेक नेत्यांनी भीती व्यक्त केली होती की, खरातच्या जीवाला धोका असू शकतो. आजची जी घटना घडली त्या घटनेने या शक्यतेला अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित केले आहे.
खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत, असे काही लोकांना वाटत आहे का? एसआयटी अजून देखील तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर आणखी जास्त संशयाचे धुकं वाढत चालले आहे. शेळके हे गुन्हेगार होते की नव्हते? हे कायद्याने ठरवले असते. कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण, आजची घटना घडली ती शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अमोल मिटकरींना अपघाताविषयी संशय
जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजित दादांच्या अपघातापूर्वीचे CCTV फुटेज समोर येऊ शकले नाही, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारचं नाही, अशीही खंत आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली.





