प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याचे आकर्षण वाढतच आहे. दुर्दैवी घटना घडूनही गर्दी अजिबात कमी होताना आढळत नाही. 26 फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याची समाप्ती होईल. तथापि गर्दीचा रेटा लक्षात घेऊन प्रयागराज रेल्वेस्थानक 26 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. कुंभमेळ्यासारख्या उत्सवांचे आकर्षण वाढतच जाईल, असा अंदाज प्रयागराजवरून बांधला जाऊ शकेल.
आगामी कुंभमेळा 2027 मध्ये नाशिकमध्ये भरणार आहे. म्हणजे त्याच्या सर्वांगीण तयारीसाठी प्रशासनाकडे जेमतेम दोन वर्षे बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक सूचना केल्याचे सांगितले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे यासाठी मोठे महाकुंभ तयार करावे. त्यात देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येऊ शकेल असे मोठे संमेलन केंद्र उभारावे. नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डींग या त्यापैकी काही सूचना. कुंभमेळ्याची तयारी सुरु असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध होते.
लोकोपयोगी प्रशासकीय निर्णय झाले की ते त्वरित माध्यमांकडे पोहोचवले जातात. पण कुंभमेळ्याच्या बाबतीत त्यापलीकडे काही हालचाली सुरु असल्याचे निदान लोकांना तरी माहित नाही. पायाभूत सुविधांच्या पातळीवर देखील फारसे काही घडत नसावे का? रस्ते बांधणी, आहेत ते रस्ते मजबुतीकरण, त्यांचे रुंदीकरण, साधुग्रामसाठी अतिरिक्त जमीन अधिग्रहण, आपत्ती व्यवस्थापन, वाहनतळ उभारणे, निवाराशेड, त्यासाठी जागेची आवश्यकता, अतिक्रमणे काढणे, बेकायदेशीर गैरकामे थोपवणे, अशी असंख्य कामे करावी लागणार आहेत. शासकीय कामकाजाची चौकट ठरलेली असते. ठरवले काम आणि पार पाडले असे घडू शकत नाही. कोणत्याही कामाची सुरुवात निविदेपासून होते.
शिवाय शासकीय कामकाजाच्या गतीविषयी लोकांचे अनुभव फारसे आशादायक नसतात. आगामी काही महिन्यांमध्ये ही सगळी कामे कशी पार पाडली जाणार असावीत? प्रशासकीय पातळीवर बैठका आयोजित केल्या जातात असे सांगितले जाते. कुंभमेळ्याच्या तयारीच्या बाबतीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद नसल्याचे सांगितले जाते. प्रयागराजमध्ये दुर्घटना घडत आहेत. नाशिकच्या एका कुंभमेळ्यातही चेंगराचेंगरी झाली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या नियोजनाचे मोठेच आव्हान प्रशासनासमोर आहे. व्यवस्थेची जबाबदारी मुख्यत्वे प्रशासनाची असते.
कुंभमेळ्यासारखे उत्सव प्रचंड महसूल मिळवून देतात. तात्पुरते का होईना पण प्रचंड रोजगार निर्माण करणारे ठरतात. त्या दृष्टिकोनातूनही काही विचार झाला असावा का? नाशिक कुंभमेळ्याच्या बाबतीत असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतील. ज्याची उत्तरे प्रशासनाने देणे अपेक्षित आहे. तथापि कुंभमेळ्याची तयारी अद्याप फक्त बैठकांच्या पातळीवरच सुरु आहे असे दिसते.