Saturday, October 3, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १९ मार्च २०२६ - संघर्षाची राख अन् संकल्पाची सिद्धी!

संपादकीय : १९ मार्च २०२६ – संघर्षाची राख अन् संकल्पाची सिद्धी!

चैत्र शुद्ध प्रतिपदा. गुढीपाडवा! पराक्रम आणि परंपरेचा हा सण एका नव्या ऊर्जेचा उगम आहे. मात्र, यंदा गुढ्या अशावेळी उभारल्या जात आहेत, जेव्हा संपूर्ण जग एका अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेले आहे. रणांगणावर पेटलेला वणवा, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि तरुणाईच्या डोळ्यांतील निराशेचे अश्रू अशा विषण्ण वातावरणात आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. ही आव्हाने पाहता, केवळ ‘शुभकामना’ देऊन चालणार नाही; तर आत्मचिंतनाची गुढी उभारणे अधिक गरजेचे झाले आहे.

- Advertisement -

आज आखाती देशांमध्ये युद्धाचा वणवा भडकलेला आहे. हे केवळ दोन देशांमधील युद्ध उरलेले नसून, त्याने जागतिक इंधन साखळीलाच सुरुंग लावला आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाचे दर वाढले की वाहतूक महागते आणि पर्यायाने ताटातील भाजीपालाही महाग होतो. महागाईचा हा भस्मासूर आज मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडवून टाकत आहे. शेअर बाजारात दररोज होणारी घसरण हे केवळ आकड्यांचे खेळ नसून, तो गुंतवणूकदारांच्या विश्वासाला बसलेला तडा आहे. अर्थव्यवस्थेच्या या गोंधळात सर्वात भयावह चित्र उमटले आहे ते रोजगाराच्या आघाडीवर. अझीम प्रेमजी विद्यापीठाचा नुकताच आलेला अहवाल डोळ्यांत अंजन घालणारा आहे. त्यानुसार, देशातील ४० टक्के पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. ही आकडेवारी केवळ चिंताजनक नाही, तर ती एका पिढीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे.

दुसरीकडे, ज्या कृषी क्षेत्राला आपण अर्थव्यवस्थेचा कणा मानतो, तोच आज खिळखिळा झाला आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि कर्जाचा डोंगरही कमी होत नाही, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे. आजच्या राजकीय घडामोडींकडे पाहिले तर एक विचित्र विरोधाभास जाणवतो. एका बाजूला आपण प्रगतीचा हुंकार भरत आहोत, तर दुसर्‍या बाजूला राजकीय मूल्ये आणि नैतिकतेला तिलांजली दिली जात आहे. गुढीपाडवा हा विजयोत्सवाचा सण आहे, पण आजचा विजय हा तत्त्वांचा आहे की केवळ आकड्यांचा, हा प्रश्न सामान्यांना सतावतोय. निवडणुकांचे वारे वाहत असताना, आरोप-प्रत्यारोपांची पातळी ज्या पद्धतीने घसरत आहे, ती चिंताजनक आहे.

गुढी उभारताना आपण ‘सत्य’ आणि ‘न्याय’ यांचे प्रतीक म्हणून तिला उंच लावतो. आजच्या राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हीच उंची आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. केवळ खुर्ची मिळवणे हा संकल्प न ठेवता, समाजहित केंद्रस्थानी ठेवण्याचा ‘राजकीय पाडवा’ कधी साजरा होणार, याची प्रतीक्षा जनता करत आहे. अलीकडच्या काळात जातीपातीच्या भिंती अधिक मजूबत होताना दिसत आहेत. आरक्षणाचे प्रश्न असोत किंवा भाषिक अस्मिता, समाजात पडलेली फूट ही चिंतेची बाब आहे. गुढीला बांधलेला साखरगाठीचा हार हा गोडव्याचे प्रतीक आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन हा गोडवा जपणे, हे या नववर्षातील सर्वात मोठे आव्हान आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि कृषी क्षेत्रातील अनिश्चितता यामुळे ग्रामीण भागातील पाडवा फिका पडला आहे.

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातील घास हिरावला असला तरी बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने गुढी उभारत आहे. हीच जिद्द संपूर्ण समाजाने आत्मसात करायला हवी. सोशल मीडियाच्या आभासी जगात हरवलेल्या तरुणाईला प्रत्यक्ष कामाच्या आणि कष्टाच्या जगात आणणे हा सामाजिक संकल्पाचा भाग असावा. नवे वर्ष म्हणजे नवी पाटी. या पाडव्याला आपण वैयक्तिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकीचे काही संकल्प सोडणे अनिवार्य आहे. गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा प्रारंभ आहे. शालिवाहनाने मातीच्या सैन्यात प्राण फुंकून शत्रूचा पराभव केला होता, अशी कथा आहे.

आजच्या काळातही आपल्यातील सुप्त सामर्थ्य जागृत करण्याची गरज आहे. नकारात्मकतेची राख झटकून, संघर्षातून संकल्पसिद्धीचा नवा प्रारंभ करण्याचा हा दिवस आहे. गुढीचा उंच डोलणारा ध्वज आपल्याला हेच सांगतो की, संकटे कितीही असोत, ध्येय उंच ठेवा. कडुलिंबाचा पाला खाताना जो कडवटपणा येतो, तो आयुष्यातील संघर्षाचे प्रतीक आहे आणि त्यानंतर मिळणारी साखरेची गाठी ही यशाची गोडी आहे. हेच जीवनाचे गणित समजून घेऊन आपण समृद्ध, सुसंस्कृत आणि प्रगतीसंपन्न समाजनिर्मितीच्या दिशेने पाऊल टाकूया.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...