नाशिक | फारूक पठाण | Nashik
सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि घराजवळच दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर (Arogyavardhini Centers) नागरिकांचा विश्वास वाढला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात शहरातील ८१ केंद्रांमधून तब्बल ६ लाख ३ हजार ४५२ बाह्यरुग्णांनी मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुरू झालेल्या या केंद्रांमध्ये दररोज सरासरी १,६५० हून अधिक नागरिक तपासणीसाठी येत आहेत. विशेषतः झोपडपट्ट्या, उपनगरे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना या सेवेचा मोठा आधार मिळाला आहे.
प्रत्येक केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पॅरामेडिकल स्टाफ तैनात असून, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत येथे ताप, सर्दी, रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग यांसारख्या आजारांवर मोफत उपचार व औषधोपचार केले जातात. याशिवाय माता-बाल संगोपन, लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांची तपासणीही येथे केली जाते.
आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार सेवा मिळत असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आगामी काळात शहरात आणखी २५ केंद्रे वाढवून एकूण संख्या १०६ केली जाईल.
डॉ. विजयकुमार देवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा




