Saturday, May 2, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ०२ मार्च २०२६ - चिंतेच्या खाईत लोटणारा संघर्ष

संपादकीय : ०२ मार्च २०२६ – चिंतेच्या खाईत लोटणारा संघर्ष

संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत लोटणारे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध हा मध्य पूर्वेतील गेेल्या अनेक दशकांच्या तणावाचा दुर्दैवी परिपाक आहे. इस्रायल व त्याचा पाठीराखा अमेरिका दीर्घ काळापासून इराणचा अणुकार्यक्रम आणि कथित क्षेपणास्त्र विकास त्यांच्या सुरक्षेसाठी धोका असल्याची हाकाटी पिटत होते. वस्तुत:, इराणने आधीपासूनच अण्वस्त्र प्रसार बंदी कायद्यावर स्वाक्षरी केलेली आहे. तसेच, बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या पुढाकाराने इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला आण्विक आस्थापनांची तपासणी करण्याचे अधिकार देणारा करारही केला होता. मात्र, जगात सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी नियतीने आपल्यावरच टाकली आहे, असा आव आणणारे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो एकतर्फी रद्द करून टाकला.

- Advertisement -

अणुबॉम्ब निर्मितीत महत्त्वाच्या असलेल्या युरेनियमच्या बाबतीत समृद्ध राहणे हे वैद्यकीय व अन्य विकासात्मक कार्यासाठी आवश्यक असल्याचा उलट युक्तिवाद इराणतर्फे केला जातो. मात्र, राज्यकारभार करताना तद्दन व्यापारी हेतू डोळ्यासमोर असलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेतील बँकिंग, व्यापार अशा अनेक क्षेत्रात प्रचंड प्रभावशाली असलेल्या ज्यू समुदायाचे जोखड मानेवरून उतरवणे शक्य नाही. एरवी, स्वत:ला सर्वशक्तिमान मानणारे हे महाशय ज्यूंच्या ताकदीपुढे हतबल होतात. त्यामुळे त्यांची कथित राष्ट्रभक्ती अगदी पोकळ आहे, असे म्हणावे लागेल. दुसरे म्हणजे, इराणने अणुबॉम्ब तयार करणार नाही, असे वारंवार सांगूनही ट्रम्प हटवादीपणा सोडायला तयार नव्हते. ‘मला अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे आहे’, अर्थात मेक अमेरिका ग्रेट अगेन हे एकच पालुपद त्यांनी लावले आहे. अमेरिकेच्या अन्य राष्ट्राध्यक्षांना जगाची होती तशी फिकीर मला नाही; मी केवळ माझ्या देशाचा विचार करतो, असे घोषित करूनही त्यांचा त्यांच्या देशातील जनाधार झपाट्याने घसरत चालला आहे.

मात्र, नव्या युगाला न शोभणारी विस्तारवादी भूमिका ते सोडायला तयार नाहीत. एकीकडे, संवादाचे नाटक करायचे आणि लागलीच टोकाची भूमिका घेऊन चर्चेचे टेबल उलथून लावायचे हाच त्यांचा खाक्या आहे. अलीकडच्या काळात व्हेनेझुएला, मेक्सिको, ग्रीनलँड या देशांवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेल्या दांडगाईतून ते दिसून आले आहेच. इराण तर त्यांना टोचत राहणार्‍या काट्यासारखाच. त्यामुळे अडेलतट्टू भूमिका घेणार्‍या अली हुसेनी खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या या देशावर इस्त्रायल-अमेरिका यांचा हल्ला केव्हा होतो याचीच उत्सुकता होती. तिच्यावरचा पडदा फेब्रुवारी महिना संपता संपता हटला. ऑपरेशन एपिक फ्युरी, म्हणजे महाप्रकोप असे दुष्ट शक्तींचा नायनाटसदृश नाव देण्यात आलेल्या या लष्करी कारवाईअंतर्गत इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. अशा प्रकारचे नेमके आणि घातक वार करण्यात तो देश वाकबगार असल्याने प्रारंभिक आक्रमणातच खोमेनी यांना ठार करण्यात यश आले. ज्या इराणमध्ये स्वयंपुरस्कृत सत्ताधारी बसवायची अमेरिकेची इच्छा आहे, त्या अमेरिकेविरुद्धच इराणी जनतेत संतापाची लाट पसरली आहे.

अमेरिकेकडे डोळे लावून बसलेले देशांतर्गत बंडखोर अद्याप उघडपणे पुढे यायला तयार नाहीत. त्यामुळे इराणमधील पेच कधी संपणार हे निश्चित नाही. तसेच, इराणनेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकन तळ असलेल्या पश्चिम आशियाई देशांवर हल्ले चढवल्याने हा संघर्ष चिघळत जाण्याचीच भीती आहे. इराणसमर्थक चीन, रशिया, उत्तर कोरिया या देशांनी इस्त्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यापलीकडे अद्याप अन्य कृती केलेली नाही. मात्र, त्यांच्या संभाव्य सहभागामुळे जग तिसर्‍या महायुद्धाकडे लोटले जाईल की काय, अशी धास्ती शांतताप्रेमी देशांना वाटते आहे. खुद्द इराण तेल वाहतुकीच्या मार्गावर मोक्याच्या भौगोलिक स्थानी आहे. जगातील जवळपास ४० ते ५० टक्के तेल वाहतूक त्या देशाच्या हद्दीतून होते आणि या संघर्षाच्या प्रारंभीच २० टक्के वाहतूक प्रभावित झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला रशिया-युक्रेन संघर्ष, अलीकडेच सुरू झालेली पाकिस्तान व अफगाणिस्तानातील लढाई आणि आता मध्य पूर्वेत मोठ्या युद्धाला फुटलेले तोंड या घडामोडी पाहता जगापुढे आणखी काय वाढून ठेवले आहे, याची काळजी कोणालाही वाटणे साहजिक आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...