Monday, October 19, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २० ऑगस्ट २०२६ - आगामी सत्तासंघर्षाची भाजपची पूर्वतयारी

संपादकीय : २० ऑगस्ट २०२६ – आगामी सत्तासंघर्षाची भाजपची पूर्वतयारी

भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारण्यास सात महिने उलटून गेल्यानंतर पक्षाची ६५ सदस्यांची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपसारख्या सदा दक्ष आणि सतत निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या पक्षाने देश पातळीवरील कार्यकारिणी जाहीर करण्यास थोडा वेळच घेतला, असे म्हणावे लागेल. ‘भारतीय जनता पक्ष हा २४ तास आणि ३६५ दिवस निवडणूक मोडमध्ये असतो’ असे राजकीय वर्तुळात म्हटले जात असले तरी पक्षाच्या या नव्या कार्यकारिणीच्या रचनेच्या बाबतीत मात्र या पक्षाचा तो लौकिक दिसू शकलेला नाही. असे असले तरी या कार्यकारिणीमागचे उद्देश स्पष्टपणे जाणवणारे आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेश आणि पंजाबसह तब्बल सात राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर नियोजन आणि राजकीय आडाखे बांधून हा चमू तयार करण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवते. या नव्या कार्यकारिणीत युवा चेहरे, अनुभवी नेतृत्व, महिला सक्षमीकरण, डिजिटल रणनीतीत बदल आणि प्रादेशिक तसेच सामाजिक समीकरणांचा अचूक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. थोडयात सांगायचे तर आगामी निवडणुका जिंकणे हाच या नव्या रचनेचा एकमेव आत्मा जाणवण्यासारखा आहे. या कार्यकारिणीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनात्मक दिशा दुरुस्ती करण्याचा झालेला प्रयत्न. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ज्या नेत्यांचे राजकीय भवितव्य अंधारात मानले जात होते किंवा जे बाजूला पडले होते, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून पक्षाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. अमेठीतून पराभूत झाल्यानंतर राजकीयदृष्ट्या काहीशा मागे पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी झालेली नियुक्ती हा या रणनीतीचा भाग आहे.

स्मृती इराणी यांच्याकडे आक्रमक वक्तृत्व आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचे कौशल्य आहे, ज्याचा वापर आगामी निवडणुकांत पक्षाला बळ देण्यासाठी केला जाईल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत राम माधव यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून झालेले पुनरागमन हे पक्ष आणि संघ परिवार यांच्यातील राजकीय व वैचारिक ताळमेळ अधिक घट्ट करण्याचे स्पष्ट संकेत देते. नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्राचे स्थान कमालीचे मजबूत राहिलेले दिसते. बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेल्या नेत्रदीपक यशाची दखल घेत विनोद तावडे यांचे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे.

केंद्रील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तावडे यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार याबद्दल उत्सुकता होती; परंतु पक्षाने त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा पुरेपूर वापर करण्याचे ठरवलेले दिसते. तर दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी आणि महिला चेहरा असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी झालेली बढती ही महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठीही सत्ताधारी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर ही एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. या कार्यकारिणीचे दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि वंचित घटकांना दिलेले व्यापक प्रतिनिधित्व. एकूण ६५ सदस्यांपैकी १२ महिला पदाधिकारी असून त्यामध्ये सहा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तीन राष्ट्रीय सचिव आहेत. तसेच अनुसूचित जाती, जमाती, शीख, ख्रिश्चन, मुस्लीम, जैन व पारशी अशा वंचित व अल्पसंख्याक समाजातील तब्बल ४० टक्के सदस्यांना स्थान देऊन भाजपने आपली सामाजिक पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

ईशान्य भारतातील राज्यांना दिलेले प्राधान्य आणि १८ खासदारांसह तीन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश संघटन अधिक सर्वसमावेशक बनवतो. आणखी एक लक्षवेधी बदल म्हणजे पक्षाची ‘डिजिटल रणनीती’ तब्बल ११ वर्षे सोशल मीडिया संयोजकपद सांभाळणार्‍या अमित मालवीय यांना हटवून त्यांच्या जागी छत्तीसगढमधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक दीपक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील आक्रमक आणि वादग्रस्त वातावरणापेक्षा आता अधिक संयमी, विचारधारा, डेटाआधारित प्रचाराकडे भाजप वळत असल्याचे हे द्योतक आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून पक्षाने आपल्या आर्थिक नियोजनात विश्वासार्हता जपली आहे. एकीकडे नितीन नवीन यांच्या रूपाने नवा युवा चेहरा अध्यक्षपदी असताना दुसरीकडे बी. एल. संतोष, सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा भक्कम पाठिंबा देऊन भाजपची ही नवी टीम आगामी महासंग्रामासाठी सज्ज झाली आहे. हा केवळ संघटनात्मक फेरबदल नसून आगामी सत्तासंघर्षाची पूर्वतयारी आहे, हेच या कार्यकारिणीवरून सिद्ध होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२६ – डिजिटल व्यवहारांचे अर्थकारण आणि विश्वास

0
Daily Deshdoot Editorial 19 October 2026 भारताच्या डिजिटल क्रांतीने आर्थिक व्यवहारांचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आणि भाजीविक्रेत्यापासून नामांकित व्यापार्‍यापर्यंत सर्वत्र यूपीआय...