महाविद्यालयीन काळातील अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास घडतो असे मानले जाते. सध्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे दिवस आहेत. श्रम केल्याशिवाय श्रमाचे महत्त्व कळत नाही. प्रत्येक काम तितकेच महत्वाचे असते. कष्टकर्यांच्या भावना आणि दुःख कष्ट केल्याशिवाय कळत नाही असे बाबा आमटे म्हणत. त्याच उद्देशाने त्यांनी श्रमसंस्कार शिबिर सुरु केले होते.
सेवा योजनेच्या शिबिरांचा देखील तोच उद्देश असतो. त्याचे उद्देशाने शिबिरे घेतली जात असावीत अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक कामे करावीत अशी आयोजकांची अपेक्षा असते. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात दोडीपाडा येथे पार पडलेल्या अशाच एका शिबिरात विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधला. सुरगाणा तालुक्यातील अनेक पाडे बाराही महिने टंचाईग्रस्त असतात. त्यांच्यासाठी पाण्याचा एक थेंबही साठवण्याचा विषय असतो. वनराई बंधारा किती उपयोगी पडेल हे वेगळे सांगायला नको.
नाशिकची जीवनदायिनी गोदावरी ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावते. पावसाळ्यात डोंगरावरील मातीची धूप होते. ती थांबवून भूजल पातळी वाढावी म्हणून विद्यार्थ्यांनी सुमारे 14 दगडी बांध बांधले. त्यांना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहजी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी उद्याच्या भारताचे नागरिक मानले जातात. शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवासात त्यादृष्टीने त्यांच्यातील प्रगल्भता वाढणे अपेक्षित असते. याच काळात राष्ट्रीयत्व, सामाजिक भान, सामाजिक कार्य, मदत आणि सहकार्य, मानवता याविषयीच्या त्यांच्या जाणिवा वाढू शकतील तसे संस्कार रुजू शकतील. सेवा योजनेची शिबिरे त्याचा एक मार्ग बनू शकतील.
भारत खेड्यांमध्ये वसतो असे महात्मा गांधीजी म्हणत. शिबिरांच्या माध्यमातून युवांना त्या भारताचा परिचय करून घेण्याची संधी मिळू शकेल. ग्रामीण भागाच्या अनेक समस्या शहरी भागापेक्षा वेगळ्या असतात. त्याची जाणीव त्यांना होऊ शकेल. शेतकरी, पिकांवर होणारा हवामानाचा परिणाम आणि त्यांच्या समस्या कदाचित त्यांना समजू शकेल. शेतकर्यांची दिनचर्या अनुभवने शक्य होऊ शकेल. कोणतेही काम उच्च किंवा हीन दर्जाचे नसते हे त्यांच्या लक्षात येऊ शकेल. शिबिराच्या काही दिवसात ते स्वावलंबन शिकू शकतील.
उपलब्ध साधनसंपत्तीत अनेक प्रकारच्या विपरितेत सुद्धा आनंदाने राहतात, एकमेकांच्या मदतीला धावून जातात हे त्यांना अनुभवायला मिळू शकेल. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी समरस होण्याची संधी शिबिरे देऊ शकतील. एका शिबिराचे असे असंख्य फायदे विद्यार्थ्यांना होऊ शकतील. तथापि त्यासाठी उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून शिबिरे घेतली जाणे अपेक्षित आहे तशी ती घेतली जात असावीत हीच अपेक्षा.