Thursday, March 13, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २२ फेब्रुवारी २०२५ - गर्दीत तर सामाजिक भान अधिक गरजेचे

संपादकीय : २२ फेब्रुवारी २०२५ – गर्दीत तर सामाजिक भान अधिक गरजेचे

सार्वजनिक सण, कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, मोर्चे, मिरवणुका अशा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देशाच्या कोणत्या न कोणत्या भागात माणसे मोठ्या संख्येने एकत्र येतात. माणूस समाजशील आहे. त्यामुळेच एकत्र येणे ही माणसांची भावनिक गरज मानली जाते. तथापि हरवत चाललेले सामाजिक भान हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे.

सामाजिक भान नसलेल्या समूहाचे गर्दीत रूपांतर होते. अशा गर्दीत एखादी अफवादेखील अफरातफर माजवण्यास पुरेशी ठरू शकते. असे झाल्यास माणसे जीव वाचवण्यासाठी माणसांनाच पायाखाली तुडवतात. रेटारेटी करतात. चेंगराचेंगरी होते आणि घुसमटून लोकांचे प्राण जाण्याची स्थिती निर्माण होते. याचा भयकारी अनुभव प्रयागराजने आणि 2003 मधील कुंभमेळ्यात नाशिकने घेतला आहे.

- Advertisement -

जळगाव-पाचोराजवळील परधाडे रेल्वेस्थानकाजवळ नुकतीच घडलेली घटना हेदेखील याचेच चपखल उदाहरण आहे. प्रयागराज प्रशासनाच्या नियोजनाचे विशेषतः वाहिन्यांनी विशेष वृत्तांकन केले. महाकुंभाला भेट दिलेल्या अनेक जाणत्या भाविकांनीदेखील त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यात तेथील महामार्गांवर झालेला वाहतूक जाम असो की चेंगराचेंगरी, या घटनांची तीव्रता वाढवण्यात लोकांचे सुटलेले सामाजिक भान हेदेखील एक कारण होते, असे निरीक्षण हे लोक नोंदवतात.

कुठेही आणि कशीही उभी केलेली आणि एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी घुसवलेली वाहने यामुळे जामचा विळखा अधिकाधिक घट्ट झाला. जनसामान्यांची सुरक्षा प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठीच कायदे, नियम बनवले जातात. त्यांची प्रसिद्धी केली जाते. जागरुकता मोहिमा चालवल्या जातात. त्यांची अमलबजावणी करण्याचा प्रयत्न प्रशासन करते, असे मानले जाते. त्याला लोकांची साथ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा प्रशासनाची जय्यत तयारीदेखील प्रसंगी मातीमोल ठरते याचे प्रयागराजमधील दुर्घटना हे उदहारण ठरू शकतील.

लोक नियम धाब्यावर बसवतात. किंबहुना असे करणे हिरोगिरी मानली जाते. कायदे पाळत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेला गृहीत धरण्याची वृत्ती फोफावत आहे. तीच बेफिकिरी प्रसंगी माणसांच्या जीवावर बेतण्याचा धोका वाढतो. 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. असे उत्सव निर्धोक पार पाडणे ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तसेच त्यासाठी केलेले नियम पाळणे आणि सामाजिक भान राखणे हे लोकांचे कर्तव्य आहे.

केवळ कुंभमेळाच नव्हे तर सामाजिक वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सामाजिक भान खोलवर रुजायला हवे. त्यासाठी लोकांची साथ अपरिहार्य आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...