Thursday, June 4, 2026
Homeपडसादपडसाद : आधीच विकासाची हौस, त्यात खरोखरीचा आला पाऊस

पडसाद : आधीच विकासाची हौस, त्यात खरोखरीचा आला पाऊस

नाशिक | शैलेंद्र तनपुरे | Nashik

यंदाच्या हंगामातील पहिल्याच पावसाने (Rain) नाशिककरांची आणि प्रशासनाचीही चांगलीच दाणादाण उडविली. ‘आधीच हौस त्यात पाऊस’ या उक्तीची प्रचिती आली. सिंहस्थाच्या कामांमुळे संपूर्ण नाशिक शहर व आसपासची गावे हडप्पा संस्कृतीची आठवण करून देत असताना त्यातच वादळी पावसाची भर पडल्याने मध्ययुगीन वातावरणाचा अनुभवही घेता आला. हा पूर्वमोसमी पाऊस असल्याने तो काही दिवस असाच वाजतगाजत येणार आणि प्रशासनाची दररोज आवर्जून पोलखोल करणार यात शंका नाही. मध्यंतरी सिंहस्थ आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा झाली तेव्हा सिंहस्थाची सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करणे हे आमच्यापुढील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचवेळेस पाऊस आला तर काय या प्रश्नावर थबकत एल निनोचा सहारा मिळाला तर तेवढेच काम आणखी पुढे रेटता येईल, असे उत्तर दिले गेले. गंमत पाहा, शेतकरी व सामान्य माणूसही गेले काही दिवस शब्दशः चातकासारखी पावसाची वाट पाहत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र कामे पूर्ण होण्यासाठी पाऊस थोडा लांबला तर बरे असे वाटत होते. त्यांच्या दृष्टीने ते योग्य असले तरी कामे प्रगतिपथावर असताना पावसाळ्यात काय होऊ शकेल, याची झलक पहिल्याच पावसाने दिली आणि सर्वप्रकारच्या प्रशासकीय यंत्रणांचे सबकुछ ठीक या आश्वासनाचे कसे बारा बाजले हेदेखील दिसले.

- Advertisement -

सर्वसाधारणपणे सुरुवातीचा म्हणजेच रोहिणी नक्षत्रातील पाऊस, ज्याला पूर्वमोसमी म्हणण्याचीही पद्धत आहे हा वादळी असतो ही निसर्गाची किमया सर्वश्रुत आहे. साहजिकच, पहिल्या पावसापूर्वी विविध यंत्रणा तयारी म्हणून बरीच कामे करीत असतात. नालेसफाई, वीजतारांवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी, धोकादायक आस्थापनांना नोटिसा देऊन ती रिकामी करणे वा पाडणे, पाणी साचू शकेल अशा संभाव्य ठिकाणांची माहिती घेऊन तेथे व्यवस्था करणे अशी बरीच कामे प्रशासनातील विविध यंत्रणा करीत असतात. यंदा ही सारी कामे उत्तमरीत्या केली गेल्याचा दावा केला गेला होता. प्रत्यक्षात, पहिल्याच पावसाने नाशिक शहर व उपनगरांची जी काही दैना झाली, ती पाहिल्यावर पावसाळापूर्व कामांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वादळी वाऱ्यामुळे शहरातील किमान ३८ ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या वा झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी त्याचा फटका वीज तारांना बसला.

परिणामी, संपूर्ण शहर जवळपास सहा ते सात तास अंधारात होते. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकाराने शहरातील सिग्नल यंत्रणा प्रभावित झाली. त्यातच रस्ते जलमय झालेले. अशातच ठिकठिकाणी कामांमुळे तयार झालेले खड्डे व त्यात साचलेले पाणी अशा प्रचंड दुर्दशेत नाशिककर सापडले. अनेकांना या विविध कारणांमुळे झालेला मनस्ताप शब्दातही व्यक्त करता येणार नाही. जवळपास सर्वच चौकांमध्ये वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर तर अभूतपूर्व परिस्थिती होती. गोदावरी काठावरही भरपूर कामे चालू आहेत, मलजल शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचेही दावे केले गेले. प्रत्यक्षात, पहिल्याच पावसात गटारींचे पाणी गोदेत मिसळल्यामुळे तिला गटारगंगेचे स्वरूप आले. खरे तर अशा पावसात झाडे पडणे ही स्वाभाविक बाब. त्यासाठी प्रशासनाला सर्वाथनि दोष देता येणार नाही, हे मान्य. त्यातच ही झाडे बीजतारांवर पडणे व त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार हेदेखील मान्य; पण अशा पावसात, वादळी वाऱ्यात टिकाव धरू शकणार नाही अशा झाडांच्या रोपणाचा हव्यास आपण कधी सोडणार हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर घ्यायला हरकत नाही.

देशी झाडांचा दुस्वास करून झटपट वाढणारे, मनमोहक फुले देणारे पण टिकाऊ नसलेले कुचकामी अशा गुलमोहरासारख्या परदेशी झाडांविषयीचे प्रेम कधी कमी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला तर गैर ठरू नये, अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी यासंदर्भात वारंवार इशारे दिले, सूचना केल्या तरी वृक्षारोपणाच्या मोहिमा झटपट उरकायच्या असल्याने तेथे अशाच वृक्षांचा आग्रह धरला जातो. आजही नाशिकच्या जवळपास सर्वच रस्त्यांच्या कडेला अशाच ठिसूळ झाडांची पैदास दिसते. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात नाशिकमध्ये जेव्हा मोठे आंदोलन उभे राहिले तेव्हा पंधरा हजार झाडांचे नव्याने रोपण करण्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्यानुसार त्याची उत्साहात तयारीही केली गेली. रोपणाचे फोटोसेशन झाले. नंतर त्या झाडांचे काय झाले याच्याही कथा प्रसिद्ध झाल्या.

पुढे महाजनांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सर्व नगरसेवक व पक्षाच्या कार्यकर्त्यांना वृक्षारोपणासाठी सांगितले गेले. त्याबाबतही वृक्षारोपणापेक्षा फोटोसेशनवरच कसा भर राहिला, याच्याही सुरस कथा चर्चिल्या जातात. आता तर राज्य शासनानेच तीनशे कोटी झाडांची लागवड राज्यभर करण्याचा महासंकल्प केला आहे. त्यावरून खासगीत पर्यावरणतज्ज्ञ खिल्लीही उडवित आहेत. कारण ठरविलेल्या कालमयदित जर अशी कोट्यवधी झाडे लावायची असतील तर त्यासाठी तयार रोपे कोठून आणावयाची असा सवाल लोक एकमेकांना विचारताना दिसत आहेत. असो, वृक्षारोपण महत्त्वाचे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ते व्हावेच. परंतु पावसाळ्यातही टिकाव धरतील अशा देशी दणकट वृक्षांची त्यासाठी निवड केली तर इतर यंत्रणाही दुवा देतील. तोपर्यंत सब चंगा जी असे म्हणूया…

ताज्या बातम्या

विराट

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय...

0
मुंबई | Mumbaiभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली...