Wednesday, February 19, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २२ जानेवारी २०२५ - एका मैदानाची कमाल

संपादकीय : २२ जानेवारी २०२५ – एका मैदानाची कमाल

एका मैदानाने गाठलेली वयाची पन्नाशी…! ती साजरी करण्यासाठी जमलेला दिग्गज खेळाडूंचा मेळा आणि त्यांनी दिलेला आठवणींना उजाळा, असा अनुपम सोहळा राज्याने नुकताच अनुभवला. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे असे अनेक नामवंत खेळाडू आणि मैदानासह त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो चाहते सोहळ्याला उपस्थित होते.

वानखेडे मैदानामुळे आपण कसे घडलो? ते सांगताना उपस्थित सर्वच खेळाडूंनी आठवणींना उजाळा दिला. वानखेडे मैदानाने राजकीय रंगही अनुभवले, पण रसिकांच्या लक्षात आहे तो, रवी शास्त्रीने मारलेले 6 षटकार, 2011 मध्ये जिंकलेला विश्वचषक आणि असंख्य खेळाडूंनी रचलेले असंख्य विक्रम! माणसांचे वाढदिवस सगळेच करतात, पण मैदानाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केल्याचे किमान लोकांच्या आठवणीत तरी नसेल. मैदानाची पन्नाशी गाठण्यात निःसंशय अनेकांचे परिश्रम कारणीभूत आहेत. त्यांचेही मन नक्कीच भरून आले असेल.

- Advertisement -

एक सुस्थितीत राखलेले मैदान काय चमत्कार घडवू शकते, याचा वानखेडे स्टेडियम हा उत्तम दाखला आहे. अशा मैदानावर क्रीडा संस्कृती बहरते. मुलांना मैदानाची गोडी लागते. कोणते ना कोणते खेळ मुले खेळतात. क्रीडा स्पर्धा भरवल्या जाऊ शकतात. त्यातून मुलांना त्यांचे कसब दाखवण्याची आणि इतरांचे बघण्याची संधी मिळते. त्यामधून खेळाडू घडतात. सुजाण नागरिक घडण्याच्या प्रवासात खेळ हा महत्वाचा टप्पा मानला जातो. खेळ सांघिक भावना शिकवतो. तंदुरुस्त ठेवतो. इतरांच्या विजयात सहभागी व्हायला शिकवतो. मानसिकता सकारात्मक बनवतो. माणसे संकटे, विपरीत परिस्थिती पेलायला शिकतात. जय-पराजय स्वीकारायला शिकतात. खेळ स्वयंशिस्त बाणवतो. लक्ष्यपूर्तीच्या दिशेने धडपड करायला लावतो. ही मूल्ये सुजाण नागरिक घडवतात. म्हणूनच खेळ हा अभ्यासक्रमाचा एक विषय असावा, अशी सूचना सचिन तेंडुलकर यांनी केली होती.

तेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते. राखल्या गेलेल्या अशाच मैदानांमुळे नाशिकमध्ये क्रीडासंस्कृती विकसित होत आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, महात्मानगर मैदान, जिमखाना, यशवंत व्यायामशाळा यांच्यासह विविध मैदाने दररोज खेळाडू आणि तंदुरुस्तीचा आग्रह धरणारे असंख्य जागरूक नागरिक यांच्या गर्दीने गजबजतात. अशी मैदाने गावोगावी उभी राहण्याची गरज आहे. ती नसली तरी विद्यार्थी अनेक गोष्टींपासून वंचित राहू शकतात. म्हणूनच मैदानाचे महत्त्व प्रशासनासह सुजाण नागरिक आणि जागरूक संस्थांनी लक्षात घेतले पाहिजे. सर्वांच्या जागरूकतेतून मैदाने उभी राहतील आणि शहरे-गावांच्या विकासात स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला जाईल आणि योगदान दिले जाईल, अशी आशा करूया!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या