Sunday, May 3, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २४ जुलै २०२५ - गल्ली ते दिल्ली… एकच चित्र!

संपादकीय : २४ जुलै २०२५ – गल्ली ते दिल्ली… एकच चित्र!

राजकीय पार्श्वभूमीच्या दोन संघटनांमधील कार्यकर्त्यांची हाणामारी, नंतर माफीनामा आणि राजीनामासत्र सध्या सुरु आहे. एखाद्या चित्रपटात शोभावीत, अशी ही हाणामार्‍यांची दृश्ये समाज माध्यमांवर वेगाने फिरत आहेत. त्यांची तुलना फक्त गल्लीतील मारामार्‍यांशी होऊ शकेल. हाणामार्‍यांनंतर राजकीय पक्षांच्या धुरंधरांनी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पदाचे राजीनामे देण्याचे आदेश मोठ्या थाटात दिले.

जे घडले ते निःसंशय चुकीचेच आहे. केवळ माफीनामा आणि राजीनाम्याने त्याची गंभीरता कमी होणार नाही, पण मुजोरपणाचा दोष फक्त कार्यकर्त्यांना देऊन चालेल का? जे वर घडते तेच खाली पाझरते, असे म्हटले जाते. संसदेत आणि विधानसभेत यापेक्षा वेगळे काय चित्र दिसते? विधानभवन परिसरात आमदार समर्थकांमध्ये हाणामार्‍या झाल्या. असंसदीय शब्दांत एकमेकांचा उद्धार झाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले. वर उल्लेख आलेली कार्यकर्त्यांमधील मारामारी त्याची छोटी आवृत्ती म्हणता येईल. त्याची शिक्षा म्हणून राजीनामा हाच निकष असेल तर अशा किती जणांना राजीनामे द्यावे लागतील? ज्यांच्या खांद्यावर विधानभवनाच्या प्रतिष्ठेची धुरा असते, त्यातील शंभरपेक्षा जास्त जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

अशा स्थितीत त्यांच्या अनुयायांकडून तरी वेगळ्या वर्तनाची अपेक्षा लोकांनी का करावी? संसदेतील कामाचे तास सातत्याने कमी होत असल्याबद्दल जाणते चिंता व्यक्त करतात. कामकाजाच्या एका तासाचा खर्च सुमारे अडीच लाख असल्याचे सांगितले जाते. संसदेत खासदारही गोंधळ घालतात. अध्यक्षांपुढील जागेत (वेलमध्ये) धावतात. राजदंड पळवण्याचा प्रयत्न करतात. काही प्रसंगात तर गोंधळी खासदारांचे निलंबनदेखील करण्याची वेळ अध्यक्षांवर येते. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागते. कोणतीच अधिवेशने याला अपवाद नसतात. देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकणारी कित्येक विधेयके गदारोळात चर्चेविनाच मंजूर होतात.

संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरु झाल्यावर लोकप्रतिनिधींच्या वर्तनात फरक पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली, पण सभ्यता कोळूनच प्यायची ठरवली असेल तर राजकीय सभ्यता आणि साधनशुचिता कशी टिकणार? आणि कोण टिकवणार? मी खूप वेदना घेऊन परत जात आहे, अशी भावना माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी व्यक्त केली होती. त्यामागची खंत तीच होती. ‘जसा राजा, तशी प्रजा’ अशी म्हण प्रचलित आहे. नेते संसद आणि विधानभवनात गोंधळ घालतात आणि त्यांचे कार्यकर्ते गल्लीत! पक्षांच्या मूल्यांच्या गप्पा तर कोणी मारूच नयेत, अशी स्थिती वरपासून खालपर्यंत आढळते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...