नवी दिल्ली | New Delhi
देशभरात आज ८० वा स्वातंत्र्य दिन ( Independence Day) अत्यंत उत्साहात साजरा झाला.राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून यावेळच्या उत्सवाला एक विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. या खास प्रसंगी देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग १३ व्यांदा राष्ट्रध्वज फडकवला आणि देशवासीयांना संबोधित केले. आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी २०२४-२०४७ या कालावधीत ‘विकसित भारत’ घडवण्याचा दृढ निश्चय व्यक्त करत आगामी काळातील भारताच्या विकासाचा सर्वसमावेशक रोडमॅप देशासमोर मांडला.
विकसित भारतासाठी वर्क कल्चर आणि विचारांमध्ये बदलाची गरज
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या शतकातील पहिली २५ वर्षे संपली असून पुढील २५ वर्षे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आता आपण थांबू शकत नाही; आपली दिशा आणि ध्येय निश्चित आहे. जे काम गेल्या ५-७ दशकांत झाले नाही, ते आपल्याला पुढील ५-७ वर्षांत पूर्ण करायचे आहे.यासाठी देशातील कार्यसंस्कृती (Work Culture), विचार आणि कामाची गती बदलणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी देशातील युवाशक्तीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
सेमीकंडक्टर, अणुऊर्जा अन् इंधनात ‘आत्मनिर्भर’ भारत
विकासाच्या वाटचालीत सेमीकंडक्टर, ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान या घटकांना केंद्रस्थानी ठेवत पंतप्रधानांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात सेमीकंडक्टर चिप्सचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी भारतात पहिल्या मोठ्या सेमीकंडक्टर कारखान्यात उत्पादन व निर्यात सुरू झाली आहे. येत्या ७-८ वर्षांत देशात आणखी ५ ते ७ नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जातील, असे सांगितले. तसेच २०२४ ते २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून पुढील दशकात ५ नवीन न्यूक्लियर रिॲक्टर सुरू केले जातील. Fast Breeder Nuclear तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अणुऊर्जेत भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने जात आहे, असेही मोदी म्हणाले.
पर्यावरणपूरक ऊर्जा आणि पाईप गॅसचा विस्तार
पर्यायी ऊर्जा स्रोतांचा प्रसार करताना मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे नमूद करत मोदी म्हणाले की, २०१४ पूर्वी केवळ ७० शहरांत असणारी ही सुविधा आता ७०० शहरांपर्यंत विस्तारली आहे. लाभार्थी घरांची संख्या २२ लाखांवरून पावणेदोन कोटी झाली आहे.सौरऊर्जेची क्षमता २ गिगावॅटवरून १६० गिगावॅटवर पोहोचली आहे. ‘पीएम सूर्य घर’ योजनेअंतर्गत ५० लाख घरांपर्यंत सौरऊर्जा पोहोचली असून प्रत्येक कुटुंबाला रु. ८०,००० ची मदत दिली जात आहे, असे मोदींनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीचा विश्वास
भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना नमन केले. तसेच, गेल्या काही दिवसांत देशातील विविध भागांत पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करत संपूर्ण देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी दिला.
गेल्या १२ वर्षांतील आर्थिक अन् औद्योगिक प्रगतीचा लेखाजोखा
मोदींनी १२ वर्षांत भारताचा सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत समावेश झाल्याचे सांगत १४० कोटी जनतेला केलेल्या संकल्पाला रोखणे आता अवघड झाल्याचे म्हटले. मागील १२ वर्षांत संरक्षण उत्पादन ४ पटीने, खादी आणि ग्रामोद्योग ५ पटीने, इलेक्ट्रॉनिक उत्पादन ७ पटीने, आधुनिक रेल्वे कोचचे काम २१ पटीने, मोबाइल उत्पादन ३१ पटीने,इंटरनेट युजर्स ४ पटीने, पेटंट ग्रँट ४ पटीने आणि डिजिटल ट्रान्झेक्शन १०० पटीने वाढले, अशी आकडेवारी दिली.




