सामान्यतः एरवी मोठ्या वयाच्या माणसांचे आरोग्य चर्चेच्या आणि विविध सर्वेक्षणांच्या केंद्रस्थानी असते. तथापि लहान मुलांमधील वाढत्या अनारोग्याकडे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नुकताच केला. लहान व अल्पवयीन मुलांमध्ये असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण चिंताजनक वाढत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.
मधुमेह, स्थूलता, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकलसेल अशा दुर्धर व्याधींचा अकाली संसर्ग झालेल्या बालकांची राज्यातील संख्या सुमारे साठ लाख असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. युनिसेफचा अहवालदेखील मुलांमधील लठ्ठपणा अधोरेखित करतो. वाढत्या लठ्ठपणामुळे उपरोक्त व्याधी संसर्गाची जोखीम कैकपटीने वाढते असा निष्कर्ष त्या अहवालात नमूद असल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. लहान बालकांमधील अस्वास्थ्य त्यांच्यासह कुटुंबाच्या मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्यावर दीर्घकालीन परिणाम करते.
मुलांचे आजारपण हा बहुसंख्य कुटुंबातील भावनिक मुद्दाही बनतो. असे होणे त्या कुटुंबासाठी निराशाजनक असते. मुले सारखी आजारी पडू नयेत, त्यांना दीर्घ व्याधींनी ग्रासू नये अशीच तमाम पालकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्न करणे त्यांच्याही हातात असते. मुलांना अकाली अशा व्याधी का गाठतात? याचा शोध घेतला तर अनेक कारणे सापडू शकतील. तथापि मोठ्यांबरोबरच मुलांनीदेखील स्वीकारलेली बैठी जीवनशैली आणि त्यापुढे त्यांच्या पालकांनी टेकटलेले हात हे समस्यांचे मूळ आढळते.
मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमालीचा वाढला आहे. बाजारात मिळणारे तयार खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ काळाच्या पडद्याआड जात आहेत. खूप प्रक्रिया (अल्ट्रा प्रोसेस्ड) केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, स्टार्च, मीठ आणि अपायकारक चरबी असते हे बहुसंख्य माणसे जाणून आहेत. मोबाईलचे व्यसन मुलांना जागा सोडू देत नाही. खेळ मोबाईलऐवजी मैदानावर खेळायचे असतात हेच मुले विसरत चालली आहेत. मुलांची झोपेची वेळदेखील कमी होत चालली आहे. गाढ आणि पुरेशी झोप ही एकूणच सर्वांगीण आरोग्याची एक गुरुकिल्ली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. अशी झोप मेंदूला ताजेतवाने करते. तसे तर घरकामदेखील व्यायामाला पूरक ठरू शकेल. तथापि किती पालक मुलांवर घरकामाचे संस्कार जाणीवपूर्वक करतात? हे शरीराचे आणि मनाचे कुपोषणच आहे.
व्याधी जडल्यावर निदान सगळेच करतात पण ती जडू नये हे मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवे. मोबाईलचा विवेकपूर्ण वापर करणे, मुलांनी रोज किमान पंचेचाळीस मिनिटे व्यायाम करणे, घरी बनवलेले अन्नपदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे असे उपाय तज्ज्ञ सुचवतात. जीवनशैलीत बदल हे याचे सार आहे. त्याचे महत्त्व पालकांना पटण्याची आणि त्यांनी ते बदल त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वीकारण्याची खरी गरज आहे. कारण लहान मुले त्यांच्या पालकांकडे बघून अनेक गोष्टी शिकतात. पालकच दिवसातील अनेक तास मोबाईलला चिकटलेले असतील, रिकामा वेळ तेच काढू शकत नसतील आणि त्यांनाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सवय असेल तर मुलांनाही त्याच सवयी आपोआप लागतात. त्याची त्यांच्यापुरती कारणे भलेही वेगळी असू शकतील किंवा काही कारणांचे समर्थन पटण्याजोगे असूही शकेल, पण ते कळण्याचे मुलांचे वय नसते.
शिवाय नियम फक्त मुलांना लागू केलेले चालत नाहीत. तसा प्रयत्न पालकांनी केला तर आजकालची मुले स्पष्ट बोलून दाखवतात आणि पालकांना अडचणीत आणू शकतील, असे प्रश्नही विचारतात. तेव्हा ‘आधी केले आणि मग सांगितले’ हाच दृष्टिकोन पालकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. शाळांच्या वेळापत्रकात क्रीडा तास असतात. पण ते तास त्यासाठीच वापरले जातात का? बहुसंख्य शाळांना मैदाने असतात का? याविषयी पालकच साशंक असू शकतील. क्रीडा तास त्याच उद्देशाने वापरले जातात की नाही यावर किती शाळा व्यवस्थापने आणि पालकांचा कटाक्ष असतो? तसा तो असायला हवा.
हा मुद्दा पालक-शिक्षक समितीमधील चर्चेचा असावा. मुलांच्या सर्वांगीण विकासात बैठ्या जीवनशैलीचा निदान काही प्रमाणात त्याग किती आवश्यक आहे याची जाणीव उपरोक्त निष्कर्ष करून देतात. अभ्यास महत्त्वाचा आहेच पण मुलांना त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी शारीरिक-मानसिक आरोग्य आत्यंतिक महत्त्वाचे आहे. ते प्राप्त करून देणारे उपरोक्तसह योगा आणि ध्यानधारणेचा संस्कार मुलांवर योग्य वयात करणे ही प्रथम पालकांची जबाबदारी म्हणावी लागेल.





