मुंबई | Mumbai
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाल्यानंतर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने संपुर्ण देशात खळबळ माजवली आहे. या पार्टीची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. अवघ्या सहा दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर १३ मिलियन फॉलोअर्स जमवले. कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकले. तर काही तासांत काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या देशातील युवकांवरील एका विधानामुळे खळबळ उडाल्यानंतर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ट्विटर खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचसोबत केली होती. हा वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मात्र, तरुणांनी या वक्तव्याला तीव्र विरोध केला आणि परिणामी ‘कॉकरोच जनता पार्टी’ सुरू झाली. या पार्टीचे सोशल मीडियावर हॅन्डल आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात या सोशल मिडिया हॅन्डलवर फॉलोअर्स आले आहेत.
पण आता कॉकरोच जनता पार्टीचे ‘एक्स’ खाते भारतात बॅन करण्यात आले आहे. पण, इंस्टाग्राम पेज अजूनही दिसत आहे. गुरुवारी सकाळीच, कॉकरोच जनता पार्टीच्या पेजने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपला मागे टाकले. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर भाजपचे ८७ लाख फॉलोअर्स आहेत.
अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत, “अपेक्षेप्रमाणे, कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे, “ज्याची भीती होती तेच घडले आहे. आधी त्यांनी आमचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते अयशस्वी झाले नाहीत, तेव्हा त्यांनी ते बॅन केले. आमचे ‘एक्स’ अधिकृत अकाउंट सध्या भारतात उपलब्ध नाही, अशी माहिती दिपके यांनी दिली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. X कडून किंवा संबंधित अधिकृत संस्थांकडून याबाबत कोणते अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
त्यांनी तरुणांनाही याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. “यावर बंदी का घालण्यात आली, याबद्दल तुम्ही सर्वांनी आवाज उठवावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर काय लिहिले होते? आम्ही फक्त सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी करत होतो. आम्ही काहीही चुकीचे लिहिले नव्हते. आणि त्याबदल्यात, त्यांनी आमचे खाते बंद केले. ही कसली लोकशाही आहे? तुम्ही सर्वांनी हे प्रश्न विचारावेत अशी माझी इच्छा आहे, असेही दिपके यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
काही अहवालांनुसार, CJP ने Instagram वर १० दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवत भाजपच्या अधिकृत अकाउंटला फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले. BJP च्या Instagram अकाउंटवर सुमारे १२ दशलक्ष फॉलोअर्स असल्याचे सांगितले जात आहे. या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ इंटरनेटवरील चर्चेचा विषय ठरत आहे.




