भारत आणि नेपाळ यांचे संबंध केवळ दोन शेजारी देशांमधील राजनैतिक संबंध नाहीत; तर ते इतिहास, संस्कृती, धर्म, परंपरा आणि परस्पर विश्वासाच्या घट्ट धाग्यांनी जोडलेले आहेत. खुली सीमा, सामाजिक सलोखा, धार्मिक श्रद्धा आणि शतकानुशतकांची सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळे या दोन्ही देशांचे नाते वैशिष्ट्यपूर्ण ठरते. मात्र, बदलत्या जागतिक राजकारणात केवळ ऐतिहासिक जवळीक पुरेशी नसते. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रातील सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असते. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या भारत दौर्यात जाहीर झालेल्या २४ हजार कोटी नेपाळी रुपयांच्या विकास पॅकेजमुळे भारत-नेपाळ संबंधांना अशीच नवी विकासाभिमुख दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेंद्र शाह यांच्यात झालेली चर्चा दोन्ही देशांच्या भविष्यातील सहकार्याचा पाया ठरावी. नेपाळमधील भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अशा संकटाच्या काळात भारताने पुनर्बांधणीसाठी मदतीचा हात पुढे करणे हे शेजारधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. संकटाच्या काळात शेजारी देशाच्या पाठीशी उभे राहणे हीच विश्वासार्ह मैत्रीची खरी कसोटी असते. या दौर्यातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे अयोध्या आणि जनकपूर यांना जोडणार्या शरयू-कमला एस्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ. प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेल्या या दोन स्थळांमधील रेल्वे संपर्कामुळे धार्मिक पर्यटनाला नवी संधी उपलब्ध होणार आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक नात्यांचे आर्थिक संधींमध्ये रूपांतर करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. भारत-नेपाळ संबंधांमध्ये ऊर्जा सहकार्य हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. नेपाळकडे जलविद्युतनिर्मितीची मोठी क्षमता आहे. भारताला ऊर्जेची वाढती गरज आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी परस्परपूरक आर्थिक धोरण स्वीकारल्यास ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती साधता येऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडथळे लक्षात घेता नेपाळला इंधन, खते आणि जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याची भारताची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. या संबंधांना भविष्याभिमुख बनवणारा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शिक्षण आणि तंत्रज्ञान. नेपाळमध्ये स्टार्टअप इनयुबेटर, इनोव्हेशन हब आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे केंद्र उभारण्याच्या उपक्रमांमुळे तेथील तरुणांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
शिष्यवृत्ती, कौशल्य विकास आणि कृषी-औद्योगिक पार्कसारख्या योजनांमुळे शिक्षणाला रोजगाराची जोड मिळू शकते. नेपाळच्या तरुण पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योजकता निर्माण करण्यावर भर दिल्यास या सहकार्याचे दीर्घकालीन परिणाम दिसतील. मात्र, भारत-नेपाळ संबंधांचा नवा अध्याय लिहिताना काही आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नेपाळचे सार्वभौमत्व, राजकीय स्वायत्तता आणि राष्ट्रीय हितसंबंध यांचा आदर राखणे आवश्यक आहे. सीमावाद, व्यापारातील असमतोल, पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे यापूर्वीही दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ घोषणा आणि सामंजस्य करारांवर समाधान मानून चालणार नाही.
प्रकल्प वेळेत पूर्ण होणे, आर्थिक मदतीचा पारदर्शक विनियोग आणि दोन्ही देशांना समान लाभ मिळणे महत्त्वाचे आहे. मैत्री टिकवण्यासाठी परस्परांचा सन्मान आणि विश्वास जपणे अपरिहार्य आहे. भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणासाठी नेपाळचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दक्षिण आशियातील स्थैर्य, आर्थिक सहकार्य आणि प्रादेशिक विकासासाठी भारत-नेपाळ भागीदारी अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. त्याचवेळी नेपाळनेही भारताशी असलेल्या ऐतिहासिक संबंधांचा उपयोग स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी करणे गरजेचे आहे. एकूणच, २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे विकास पॅकेज ही केवळ आर्थिक मदतीची घोषणा नाही, तर परस्पर विश्वासाला विकासाची जोड देण्याचा प्रयत्न आहे.
या मैत्रीचे यश किती मोठ्या घोषणा झाल्या यावर नव्हे, तर त्यातून सामान्य नागरिकांच्या जीवनात किती सकारात्मक बदल घडले यावर ठरणार आहे. अयोध्या ते जनकपूर रेल्वेचा प्रवास हा दोन देशांच्या सांस्कृतिक जवळिकीचा प्रतीकात्मक दुवा आहे; आता याच मार्गावरून आर्थिक समृद्धी, सामाजिक प्रगती आणि परस्पर विश्वासाचाही प्रवास सुरू होणे गरजेचे आहे. भारत आणि नेपाळने हातात हात घालून विकासाचा हा नवा अध्याय प्रत्यक्षात उतरवला, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी ती सहकार्याची आदर्श दिशा ठरू शकते.




