Friday, November 27, 2026
HomeनगरAhilyanagar : सकस आहाराचा संदेश आता शाळाशाळांत पोहोचणार

Ahilyanagar : सकस आहाराचा संदेश आता शाळाशाळांत पोहोचणार

‘एफडीए’कडून ‘योग्य आहार चळवळ’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध, पोस्टर स्पर्धा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नागरिकांमध्ये अन्न सुरक्षा, सकस व संतुलित आहार, सुरक्षित अन्न सेवन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभरात ‘योग्य आहार चळवळ, महाराष्ट्र’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ‘योग्य आहार मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर 1 ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधील जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना निर्देश दिले आहेत. निबंध व पोस्टर स्पर्धेत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट करण्यात आले आहेत. लहान गटासाठी ‘आरोग्य हीच संपत्ती’, ‘निरोगी आयुष्य माझी भूमिका’ आणि ‘फळे आणि भाज्या खाऊया, निरोगी राहूया’ असे विषय देण्यात आले आहेत. तर मोठ्या गटासाठी ‘अन्न सुरक्षा : निरोगी समाजाचा भक्कम पाया’, ‘जंक फूड संस्कृती आणि त्याचे दुष्परिणाम’ तसेच ‘आरोग्यदायी सवयींची सुरूवात स्वतःपासून’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. पोस्टर स्पर्धाही याच दोन गटांत घेण्यात येणार आहे. यासाठी सकस व संतुलित आहार, अन्न सुरक्षा, अन्न भेसळ प्रतिबंध, सुरक्षित अन्न हाताळणी, निरोगी जीवनशैली, अन्नाची नासाडी टाळणे आणि शाश्वत अन्न पध्दती या विषयांवर जनजागृती करणारे पोस्टर विद्यार्थ्यांना तयार करावे लागणार आहेत.

योग्य आहार मेळाव्यामध्ये केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, भेसळ प्रतिबंध, संतुलित आहार आणि सुरक्षित अन्न हाताळणीबाबत माहिती देणारे स्टॉल्स, जनजागृतीपर प्रदर्शन, पथनाट्य, प्रात्यक्षिके आणि अन्य नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. स्थानिक आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचे मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सायकल रॅली किंवा वॉकथॉन यापैकी किमान एका उपक्रमाचे आयोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 11 ते 17 जानेवारी 2027 दरम्यान सायकल रॅली किंवा वॉकथॉन आणि 18 ते 24 जानेवारी 2027 दरम्यान योग्य आहार मेळावा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अन्य शासकीय व निमशासकीय संस्थांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये अन्न सुरक्षा, सकस व संतुलित आहार, सुरक्षित अन्न सेवन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी सदर मोहिमेची तयारी येथील अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये निबंध आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
– गौरव जगताप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर.

ताज्या बातम्या

Onion Rate : कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकर्‍यांची चिंता वाढली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यासह लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1 हजार 749...