Friday, June 5, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २८ जुलै २०२५ - सुजाणत्वाची पेरणी

संपादकीय : २८ जुलै २०२५ – सुजाणत्वाची पेरणी

वाढती बालगुन्हेगारी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून येत आहे. मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. अत्यंत किरकोळ कारणांवरून मुले एकमेकांच्या जीवावर उठतात. कोणत्याही कारणामुळे एकदा का मुलांचा गुन्हेगारी वर्तुळात प्रवेश झाला की, ते त्यात अधिकाधिक अडकत जाण्याचा धोका असतो. त्यात आता सायबर गुन्ह्यांची भर पडली आहे.

इंटरनेटवरील ‘डार्क वेब’ हा भयानक प्रकार आहे. समाज माध्यमांवरील चकचकाटाचे आणि झगमगाटाचे आकर्षण मुलांना वाटू शकते. त्याच्या मोहापायी ते चुकीच्या मार्गाला लागू शकतात. पैसे कमावण्याचे बेकायदेशीर मार्ग शोधू शकतात. समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ शकतात. त्यात अडकलेल्या मुलांचे आयुष्य पणाला लागते. त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो. भविष्य काळवंडते. अशी मुले भविष्यात अट्टल गुन्हेगार बनण्याचा धोका नाकारता येत नाही. मुलांना त्यांच्या योग्य वयात याची समज द्यायला हवी.

- Advertisement -

गुन्हेगारीचा शेवट मुलांना तुरुंगाकडे आणि कठोर शिक्षेकडे घेऊन जातो हे त्यांच्या लक्षात आणून दिले तर कदाचित मुले गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. त्यादृष्टीने नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सरकारी शाळा, महाविद्यालये, खासगी लासेस आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गुन्हेगारी जगत आणि त्याचे भीषण परिणाम यांची जाणीव करून देणे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

मुलांना पोलीस उत्तम पद्धतीने समजावून सांगू शकतात. त्यांचा प्रभाव मुलांवर निश्चित पडू शकतो. आतापर्यंत ५ जिल्ह्यांतील सुमारे १३ हजार मुलांपर्यंत या उपक्रमातून पोहोचल्याची माहिती संबंधितांनी प्रसार माध्यमांना नुकतीच दिली. मुलांना सजग करण्यात पालकांचीही मोठी जबाबदारी आहे. कारण कौटुंबिक कलह, हिंसक गेम खेळणे, टीव्हीवर त्याच आशयाचे सिनेमे पाहणेदेखील मुले गुन्हेगारीकडे वळण्याची कारणे मानली जातात. आटत चाललेला कौटुंबिक जिव्हाळा, आपुलकी आणि परस्पर संवादाचा अभाव मुलांना बालगुन्हेगारीकडे ढकलू शकतो, असे मानसतज्ञ सांगतात. म्हणून मुलांच्या प्रबोधनासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने सुरु केलेल्या या उपक्रमाची व्याप्ती भविष्यात त्यांच्या पालकांपर्यंत वाढवता येईल. त्यामुळे पालकांना या समस्येचे गांभीर्य वेळीच लक्षात येऊ शकेल.

मुलांबाबत कोणती दक्षता घ्यायची तेही पालकांच्या लक्षात येऊ शकेल. बालगुन्हेगारीमागील कारणे प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत. विद्यार्थी जीवन मुलांच्या जडणघडणीचा काळ मानला जातो. याच काळात त्यांच्या जाणीवा विकसित झाल्या, त्यांच्यात सामाजिक भान, कायदा पालन आणि मूल्यसंस्कार रुजवले गेले तर त्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो. यातून सुजाण नागरिक घडण्यास मदत होते. तात्पर्य, मुलांना चांगला माणूस घडवण्याच्या प्रयत्न म्हणून, सुजाणत्वाची पेरणी म्हणून अशा उपक्रमांकडे पाहता येईल.

ताज्या बातम्या

MLC Election : प्राजक्त तनपुरे बिनविरोध

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उमेदवारी अर्ज माघारीवरून घेण्यात आलेला आक्षेप गैरसमजूतीतून घेण्यात आल्याबाबतचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे...