भारतीय शेअर बाजारातील सध्याची घसरण ही केवळ निर्देशांकांच्या लाल रंगात उमटणारी आकड्यांची कहाणी नाही; ती कोट्यवधी गुंतवणूकदारांच्या आर्थिक सुरक्षिततेला आणि मानसिक स्थैर्याला बसलेला धक्का आहे. दररोज घटणारे बाजारमूल्य, आटणारी गुंतवणूक आणि भविष्याबद्दल वाढणारी अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न घोंघावत आहे, तो म्हणजे पुढे काय? मात्र, बाजारातील प्रत्येक घसरण म्हणजे आर्थिक संकटाची चाहूल आणि प्रत्येक तेजी म्हणजे समृद्धीची हमी, असे मानणे चुकीचे ठरेल. सध्याच्या पडझडीकडे भावनिक प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर जागतिक घडामोडी, आर्थिक वास्तव आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची दिशा तपासण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.
या अस्थिरतेच्या केंद्रस्थानी पश्चिम आशियातील भू-राजकीय संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील वाढता दबाव आहे. भारतासारख्या तेल आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या देशासाठी महागडे खनिज तेल हे केवळ इंधनाचे संकट नसते; ते महागाई, उत्पादनखर्च, व्यापारतूट आणि रुपयाच्या विनिमय मूल्यावर परिणाम करणारे आर्थिक आव्हान असते. तेल महागले की वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढतो, कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा येतात आणि ग्राहकांच्या क्रयशक्तीवरही ताण पडतो. परिणामी, अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत निर्माण होणारी अनिश्चितता शेअर बाजारात प्रतिबिंबित होते. यात भर पडते ती परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विक्रीची. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात.
अमेरिकेतील रोख्यांवर आकर्षक परतावा मिळत असेल, डॉलर मजबूत होत असेल किंवा उदयोन्मुख बाजारांमधील जोखीम वाढत असेल, तर भारतासारख्या बाजारांतून भांडवल बाहेर पडू शकते. मोठ्या प्रमाणावरील ही विक्री बाजारातील घसरण अधिक तीव्र करते. विशेषतः लार्ज-कॅप समभागांवरील दबावामुळे प्रमुख निर्देशांक कमकुवत होतात; तर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये तरलतेचा अभाव आणि अतिमूल्यांकन यांमुळे अधिक तीव्र पडझड होण्याची शयता असते. तथापि, या चित्राची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची देशांतर्गत मागणी, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, डिजिटल विस्तार, औद्योगिक विकास आणि वाढती वित्तीय भागीदारी हे दीर्घकालीन सामर्थ्याचे आधार आहेत. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि नियमित गुंतवणूक करणारे नागरिक बाजाराला काही प्रमाणात स्थैर्य देतात.
मात्र, देशांतर्गत पैसा बाजाराला आधार देतो म्हणून घसरण थांबेलच, अशी हमी नाही. अर्थव्यवस्थेची क्षमता आणि शेअर्सचे सध्याचे मूल्यांकन यांत फरक असतो. चांगली कंपनीही अवाजवी किमतीत घेतल्यास गुंतवणूकदाराला नुकसान सहन करावे लागू शकते. म्हणूनच या काळात गुंतवणुकीचा केंद्रबिंदू केवळ तेजीच्या अपेक्षांऐवजी कंपन्यांची आर्थिक गुणवत्ता असायला हवा. सातत्यपूर्ण उत्पन्न, नियंत्रित कर्ज, सक्षम रोख प्रवाह, पारदर्शक व्यवस्थापन आणि वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, दूरसंचार आणि काही उपयुक्त सेवांसारखी क्षेत्रे तुलनेने स्थिर मागणीमुळे प्रतिकूल परिस्थितीत आधार देऊ शकतात. मात्र, कोणतेही क्षेत्र पूर्णपणे मंदीरोधक नसते. त्यामुळे क्षेत्राच्या लोकप्रियतेपेक्षा कंपनीची गुणवत्ता, किंमत आणि संभाव्य जोखीम तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.
गुंतवणूकदारांनी घाईघाईने समभाग विकणे किंवा पडलेल्या बाजारात विचार न करता मोठी गुंतवणूक करणे, या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळल्या पाहिजेत. दीर्घकालीन उद्दिष्टे, आर्थिक गरजा आणि जोखीम सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत. विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचे विभाजन, पुरेशी आपत्कालीन बचत आणि गरजेनुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक हे विवेकी पर्याय ठरू शकतात. अल्पकालीन खर्चासाठी लागणारा पैसा शेअर बाजारात गुंतवणे टाळावे. तसेच, कर्ज काढून किंवा अफवांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करण्याचा मोह आवरावा. शेवटी, बाजारातील पडझड ही ना सर्वस्व गमावल्याची घोषणा आहे, ना स्वस्तात संपत्ती मिळवण्याची हमखास संधी. ती विवेक, शिस्त आणि संयम यांची परीक्षा आहे.
जागतिक संकटांवर भारताचे नियंत्रण नसले, तरी स्वतःच्या गुंतवणुकीतील जोखीम नियंत्रित करणे आपल्या हातात आहे. बाजार सावरण्याची वाट पाहताना मूलभूत आर्थिक वास्तवाकडे दुर्लक्ष करता कामा नये. भीतीपोटी घेतलेले निर्णय नुकसान वाढवू शकतात; तर अंधाधुंद आशावादही संकटात लोटू शकतो. म्हणूनच ङ्गघाई नको, अतिरेकी आशावाद नको आणि विवेकाशी तडजोड नकोफहा खरा आजच्या काळातील गुंतवणूक मंत्र आहे. कारण बाजारातील वादळ थांबण्याची वेळ आपल्या हातात नसली, तरी त्या वादळात आपली आर्थिक नौका किती सक्षम ठेवायची, हे निश्चितच आपल्या हातात आहे.




