श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
सलग 365 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या श्रीरामपूर नगर परिषदेवर आठ दिवसांतून एकदा म्हणजे दर बुधवारी पाणी पुरवठा करण्याची नामुष्की श्रीरामपूर पालिकेवर आली आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांना आजपासूनच अडीच महिने तरी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
भंडारदरा धरणातून सुटणार्या आवर्तनाचा कालावधी आणि श्रीरामपूरच्या साठवण तलावात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्याचा मेळ घालण्यासाठी नगरपालिकेने आठ दिवसांतून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष करण ससाणे यानी तातडीने काल दुपारी सत्ताधारी, विरोधी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन हा कठोर निर्णय घेतला आहे.
भंडारदरा धरणाचे आवर्तन 16 डिसेंबरला सुटणार आहे. सध्या बाष्पीभवनामुळे श्रीरामपूरपर्यंत पाणी येण्यास चार ते पाच दिवस लागू शकतात. त्यामुळे किमान 20 ते 21 डिसेंबरपर्यंत पाणी श्रीरामपूरपर्यंत पोहचू शकते. सध्या श्रीरामपूर तलावात 13 दिवस पुरेल इतके पाणी आहे. हे पाणी नगरपरिषदेला 21 डिसेंबरपर्यंत पुरवायचे असल्यामुळे आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितली.
श्रीरामपूरकरांची धावपळ, पाण्याच्या टाक्या हातोहात विकल्या
आठ दिवसांनी पाणी येणार असल्याचे वृत्त सोशल मिडियातून प्रसारित होताच श्रीरामपूरकरांची धावपळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पाणी साठविण्यासाठी अनेकजण टाक्या खरेदी करण्यासाठी गर्दी करीत होते. अनेक दुकानांत टाक्या हातोहात विकल्या गेल्या. काही दुकानदारांनी खरेदी करणारांची यादी करून आगाऊ रक्कम घेतली आहे. एवढेच नव्हेतर ही संधी साधून 200-300 रूपयांनी भाव वाढविले आहेत.
सरकारने निधीलवकर द्यावा
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या 10 ते 12 दिवसांत एखादे आवर्तन सोडावे अशी विनंती नगरसेवकांकडून केली जाणार आहे. असे झाल्यास पाणी सोडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. दरम्यान, नवीन 173 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे त्यातील साठवण तलावाचे काम डिसेंबर पूर्ण होणे अपेक्षित असेल तरी कामाची गती बघता ते शक्य होणार नाही. या कामासाठी लागणारा 15 कोटी रुपयांचा निधी शासनाकडे थकलेला आहे. त्यातील दहा टक्के पालिकेचा हिस्सा असतो. पालिकेने त्यांचा हिस्सा सदर बँक खात्यामध्ये दीड कोटी रुपये वर्ग केलेले आहे. उर्वरित साडेतीन कोटी रुपये शासनाकडून अद्याप प्राप्त झालेले नाही. हा निधी येण्यासाठीचा 20 ते 22 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, असे असले तरी संबंधित ठेकेदाराने आपले काम बंद ठेवलेले नाही. मात्र या कामावर कामगार वाढवून त्याला गती देण्याची गरज आहे, असे झाले तरच श्रीरामपूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर होऊ शकणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष ससाणे यांनी दिली..




