Sunday, June 14, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २९ ऑगस्ट २०२५ - मार्गदर्शक सूचनांच्या पलीकडे..

संपादकीय : २९ ऑगस्ट २०२५ – मार्गदर्शक सूचनांच्या पलीकडे..

देशभर खळबळ उडवलेल्या समय रैना आणि रणवीर अलाहाबादीया प्रकरणाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या कोर्टात टाकला आहे. समय आणि रणवीरला विनाअट माफी मागायला सांगितले आहेच, पण समाज माध्यमांवर वापरल्या जाणार्‍या भाषेबद्दल मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा आदेशही सरकारला दिला आहे. सरकारी कार्यपद्धती न्यायसंस्था जाणून असल्याने या सूचना तयार करण्याची घाई करू नये, तांत्रिक मुद्दे आणि या माध्यमाची व्यापकता लक्षात घ्यावी, असेही सरकारला बजावले आहे.

- Advertisement -

समाज माध्यमांचा प्रभाव माणसांच्या दशदिशा व्यापून आहे. त्याच्या चांगल्या आणि विशेषतः सतत चर्चिल्या जाणार्‍या वाईट परिणामांविषयी लोकांना आता वेगळे सांगायची गरज नाही. या माध्यमांवर वापरली जाणारी भाषा हा चिंतेचा विषय आहे आणि त्यात सरकारने हस्तक्षेप करून ती भाषा नियमांच्या चौकटीत बसवावी ही न्यायालयाची अपेक्षाही रास्तच म्हणावी लागेल. पण खरेच तेवढ्याने हा प्रश्न सुटू शकेल का? कायद्याने किंवा नियमांनी प्रश्न सुटतात हा सामूहिक भ्रम अनेकदा अधोरेखित झाला आहे.

वास्तवात तसे घडले असते तर समाजातील गुन्हेगारी दखलपात्र कमी झाली असती. असो, तर मुद्दा आहे समाज माध्यमांवरील असंसदीय भाषेचा म्हणजेच मजकुराचा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखत सरकार तशा मार्गदर्शक सूचना तयार करेलही. पण समाज माध्यमांच्या प्रभावाचा समाजहितासाठी वापर वाढावा यासाठी सूचना आखणीच्या पुढे जाऊन सरकारला बरेच करता येण्यासारखे आहे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर चांगल्या प्रभावकांची समिती नेमून ती सरकारला मार्गदर्शन करेल. चांगले आणि वाईट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा नकारात्मक मजकुराचा प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक मजकुराला सर्वार्थाने पाठबळ दिले जाऊ शकेल.

समाज माध्यमांवर असा मजकूर टाकणार्‍यांची संख्यादेखील प्रचंड आहे. जगाचे भौगोलिक राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, देशाचा आणि जगाचा इतिहास, त्याचा परस्पर संबंध व गुंतागुंत, अर्थशास्त्रीय निर्णय आणि त्याचे संभाव्य परिणाम, सरकारी निर्णयांचा परामर्श अशा अनेक मुद्यांवर अनेक युवा मजकूर टाकत असतात. त्यापैकी किती जणांची नावे लोकांना माहीत असतात? किती लोक त्यांच्या खात्याचे सदस्य असतात? अभिजित छावडा यांच्यासारखा एखादा अपवाद ठरू शकेल. असे आशयकर्ता (कन्टेन्ट क्रिएटर) आणि त्यांच्या मजकुराला व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील.

प्रतिष्ठा व ओळख समाजात त्यांचा प्रभाव वाढवू शकेल. लोकांना ते आकर्षित करू शकतील. इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उदाहरण चपखल ठरू शकेल. दावोस इथे त्यांची दरवर्षी परिषद पार पडते इतकेच देशातील लोकांना कदाचित माहीत असू शकेल. पण त्यांनी जागतिक स्तरावरच्या समाज माध्यमांवरील युवा प्रभावकांना त्यात सहभागी करून घेतले. त्यांच्या खात्यावर याविषयी सातत्याने सर्जनशील पद्धतीने मजकूर टाकला. त्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत हा फोरम आणि त्याचे काम पोहोचवण्याचा प्रयोग केला होता.

नाशिकमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने असा प्रयोग, अर्थात संशोधनाअंती व नियोजनपूर्वक केला जाऊ शकेल. राष्ट्रीय पातळीवर दिलेेले या क्षेत्रातील पुरस्कार हेही त्याचे उदाहरण आहे. त्यानिमित्ताने अनेक चांगल्या प्रभावकांचा समाजाला परिचय होऊ शकला. लोक त्यांंना ओळखू लागले. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुला यांचे स्वागत आणि त्यांची घेतली जात असलेली व्यापक दखल, त्यांच्याविषयी आणि अंतराळ क्षेत्राविषयी औत्सुय निर्माण करणारी ठरली. विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेले प्रश्न हे त्याचे द्योतक ठरू शकतील.

समाजहितासाठी समाज माध्यमांचा व्यापक वापर करणार्‍यांच्या परिषदा ठराविक अंतराने सरकारी पातळीवर दर्जेदार पद्धतीने आयोजित केल्या जाऊ शकतील. समाज माध्यमांमुळे प्रसिद्धी, ओळख आणि त्या माध्यमातून प्रतिष्ठा मिळते म्हणूनच लाखो लोक त्या माध्यमांचा उपयोग करतात. त्याच त्रिसूत्रीचा वापर करून वाईट मजकुराची रेषा छोटी करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर केले जाऊ शकतील. अशा अनेक गोष्टी सरकारला करता येण्यासारख्या आहेत. ‘इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो’ अशा आशयाचे फलक नुकतेच मुंबईत झळकले. समाज माध्यमांच्या प्रभावाला ते अधिक संयुक्तिक ठरते.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...