बहुसंख्य पालक मूलकेंद्री असतात. म्हणजे दिवसाचे चोवीस तास त्यांच्या मनात मुलांचेच विचार सुरू असतात. त्यात पुढे त्याने काय शिकावे याचा विचार प्राधान्यक्रमावर असतो. त्यात गैर काहीच नाही, पण यामुळे वर्गाच्या चार भिंतींच्या आत शिकण्यापुरतीच व्याख्या मर्यादित होते. तथापि सभोवतालच्या शाळेतही मुलांना मनसोक्त विहार करू दिला, त्यांच्या विचारांना मोकळीक दिली तर मुले त्यांच्या वयाच्या तुलनेत अचाट कामे आणि धाडस करू शकतील. त्यांच्या भरारीला आकाशही कमी पडू शकेल.
नुकतेच पंतप्रधान बालवीर पुरस्कार दिले गेले. त्यात महाराष्ट्रातील तीन मुलांचा समावेश आहे. सगळे पुरस्कारार्थी याचे चपखल उदाहरण ठरू शकेल. नऊ वर्षांच्या सौरवकुमारने बुडत असलेल्या तीन मुलींना वाचवले. असेच शौर्य इतर मुलांनी दाखवले. सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या ओम जिग्नेशला पाच हजारांपेक्षा जास्त संस्कृत श्लोक पाठ आहेत. 15 वर्षांच्या सिंधुरा राजाने पार्किन्सन्स झालेल्यांना स्थिरता देऊ शकतील, अशी उपकरणे विकसित केली. 17 वर्षांच्या ऋषीक कुमारने काश्मीरमध्ये पहिली सायबर सुरक्षा फर्म सुरू केली. हे काही बालवीर आहेत. इतर सर्व विजेत्यांनी असेच अचाट पराक्रम गाजवले आहेत. ते वाचून किंवा ऐकूनच माणसे थक्क होतात.
पुरस्कारार्थी सगळीच मुले अडनिड्या वयाची आहेत. तरीही कुठून आले त्यांच्यात हे सामाजिक भान? मदतीला धावून जाण्याची वृत्ती? संकटांवर, शारीरिक अपंगात्वावर मात करण्याची विजिगिषू वृत्ती आणि प्रचंड आत्मविश्वास? मुलांच्या सुरक्षेच्या नादात त्यांच्यावर बंधने लादली जातात. त्यांनी सतत नजरेसमोर असावे, असे अनेक पालकांना वाटत असते. शाळेत शिकण्यालाच शिक्षण मानून सदासर्वकाळ मुलांनी अभ्यास करावा, अशीच पालकांची अपेक्षा आढळते. त्याव्यतिरिक्त मुलांनी कशातच म्हणजे, मित्रांबरोबर हुंदडण्यात, मैदानी खेळ खेळण्यात वा त्यांच्या भाषेत चकाट्या पिटण्यात वेळ वाया घालवू नये, हीच इच्छा आढळते. तथापि संवेदनशील वयात मुले प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकत असतात. त्यांच्या परीने विचार करत असतात.
काळजी, सहवेदना, सामाजिक बांधिलकी, मदतीची-आपुलकीची-जिव्हाळ्याची भावना परिचयाची होत असते. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. हे समजणारे पालक सुजाण मानले जातात. मुलाच्या सर्वांगीण विकासाला त्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्व असते. बालवीर पुरस्कारार्थींचे पालक हे त्याचे उदाहरण आहे. त्यांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादले गेले नाही तर मुले फुलतात. काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती विकसित होते, हे मर्म सर्वच पालकांनी लक्षात घेण्यासारखे आहे. पुरस्कारविजेत्या सर्व बालवीरांचे अभिनंदन!