जगात सर्वत्र महिला हिंसाचार निर्मूलन पंधरवडा साजरा होत असतानाच त्यांच्यावरील अन्यायाची भयावह पुष्टी करणारा अहवाल प्रसिद्ध व्हावा याला केवळ योगायोग म्हटले जाऊ शकेल का? सामाजिक समस्यांची दखल घेऊन त्याला वाचा फोडणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे. ‘देशदूत’ ते नेहमीच पार पाडतो. म्हणूनच कालनंतर आज पुन्हा एकदा या मुद्याला हात घातला आहे. कारण निष्कर्षही गंभीर आहे.
रोज 140 महिलांची त्यांच्याच कुटुंबियांकडून हत्या होते असा निष्कर्ष त्यात नमूद असल्याचे माध्यमांतील वृत्तात म्हटले आहे. कोणाचीही किंवा कोणतीही हत्या अचानक घडत नाही. जसे शारीरिक अनारोग्याची चाहूल आधीच लागते. शरीरांतर्गत लक्षणे दिसू लागतात तसेच हत्यांच्या बाबतीतही घडत असू शकेल. छोट्या छोट्या कुरबुरींकडे महिला दुर्लक्ष करत असाव्यात. तसे त्यांनी करू नये. अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा. ते मुलींना शिकवायला हवे हे खरे. तथापि ते शिकवता शिकवता छोट्या- मोठ्या कुरबुरींचे वितंडवादात रूपांतर होऊ नये यासाठी समंजसपणाचे संस्कारदेखील करणे गरजेचे नाही का? नात्यातील दोन्ही व्यक्तींनी दाखवलेला समंजसपणा आणि विवेक यावरच ते नाते पुढे जाते हे मुला-मुलींना शिकवणे ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे.
महिलांनी जसे टोकाचे सहनशील असणे गैर तद्वत पुरुषांची पुरुषी मानसिकतादेखील गैरच मानली जायला हवी. महिलांकडून जशी परिपक्वतेची अपेक्षा केली जाते तसाच पुरुषांनीदेखील संयम राखायला नको का? एकमेकांना आदर देणे, गुणदोषांसहित एकमेकांचा स्वीकार करणे ही नात्याची वीण घट्ट बनवते. तसे घडले तर कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या, कोणत्या गोष्टी धसास लावायच्या याचे भान आपोआपच येऊ शकेल.
नाते टिकवायचे की तोडायचे याचे भान विवेक देतो. त्याची रुजवण मुला-मुलींमध्ये सारखीच असायला हवी. एकदा का नाते टिकवण्याला प्राधान्य द्यायचे ठरले तर मग आपोआपच राईचा पर्वत होऊन परिस्थिती टोकाला जाणे टळू शकेल. संताप, द्वेष, सूडभावना अशा भावना विवेकावर मात करू शकणार नाहीत. सहनशीलतेला आणि नात्यांना परिपक्वतेचे आणि विवेकाचे कोंदण असणे हा अजिबात आदर्शवाद नाही. भारतीय कुटुंबसंस्थेचा तो पाया आहे. जो आजही अनेक कुटुंबांमध्ये टिकून आहे. कुटुंबपद्धतींचे फायदे वेगळे सांगायला नकोत. ती टिकण्यातच कुटुंबाचे आणि समाजाचे हित दडलेले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा