जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईतील आझाद मैदानाकडे जाण्याची घोषणा केली आहे. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मुंबई जातानाच्या प्रवासात एकूण चार मुक्काम करणार असून पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करू, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. न्यायदेवतेचा सर्व मराठा समाजाने सन्मान करावा तसेच शांततेत आंदोलन करावे, असे विशेष आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवत अंतरवली सराटीतील उपस्थित महिला आंदोलकांनी मुंबईला सोबत येण्याची मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येण्या ऐवजी सर्व महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे.
माझ्या समाजाच्या लोकांना हे लोक मोठं होऊ देत नाहीत… मी पुन्हा तुम्हाला दिसेन की नाही माहिती नाही, पण ही आपली शेवटची लढाई आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटीतील बैठकीत अत्यंत भावूक झाले. हे बोलताना जरांगेंचे डोळे पाणावले आणि कंठ दाटून आला. या भावनिक आवाहनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली.
अमृताताई आणि लताताईकडे तुम्ही हळदी-कुंकू घेऊन जा
सर्व महिलांनी अमृताताई आणि लताताई यांच्या घरी हळदी कुंकू घेऊन जायचे. अमृताताई आणि लताताईकडे तुम्ही हळदी-कुंकू घेऊन जा, हळदी कुंकू लावा लावा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची बायको हळदी-कुंकाला बाहेर नाही आल्यात तर हे हिंदू कसे? हळदी-कुंकू सौभाग्याचे लेणे आहे. फडणवीसांनी लाडकी दीदी आणि एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण ते उन्हात उभे करणार नाहीत. दोघांना 25 लाख महिलांना जेवण द्यावे लागेल. अमृताताई आणि लताताई कडे जायचं, हिंदू असतील तर त्या बाहेर येतील. अन्यथा सगळ्या जगात याची बातमी जाईल. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर हळदी-कुंकाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची बायको बाहेर येणार नसतील तर मग त्यांच्या मनगटाला काय चुना लावायचा का? असा खोचक सवालही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
लाडक्या बहिणी भावांना भेटायला येत आहे
सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ देत जरांगे पुढे म्हणाले, लाडक्या बहिणींचा एक भाऊ देवेंद्र फडणवीस आहेत, तर दुसरा भाऊ एकनाथ शिंदे आहेत. शिंदे साहेबांची तुम्ही ‘लाडकी बहीण’ आणि फडणवीस साहेबांची ‘लाडकी दीदी’ आहात. आता या लाडक्या बहिणी भावांना भेटायला येत आहेत, तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्वागतासाठी स्वतःच्या दारात मोठा मंडप टाकावा आणि जेवणाची व्यवस्था करावी.
दोन्ही भावाकडे मरणाचा माल आहे
लाडकी बहीण रट्टे खाऊ शकत नाहीत. दोन्ही भावाकडे मरणाचा माल आहे. वर्षावर राहणाऱ्या भावाचे पैसे दिसत नाहीत, ते खूप चिकट आहे. दुसऱ्या भावाचा माल जाहीर दिसतो. जी तारीख ठरलं त्या तारखेला मराठ्यांचे वादळ उठेल. देशाचा मिडिया बघेल. या मोहिमेसाठी सावध राहा, डोकं वापरून आणि शांततेने आंदोलन करा, असे आवाहन ही मनोज जरांगे यांनी केलं आहे.
गृहमंत्र्यांनी आम्हाला अडवू नये
मुंबईला जाताना मराठ्यांना मान खाली घालायला लावू नका. अंतरवालीतून मुंबईला जाताना पोलीस आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला अडवू नये, असं आवाहन जरांगे पाटील केलं. पोलिसांनी अडवल्यास जिथं अडवतील तिथं शांतपणे बसून राहण्याचं आवाहन केलंय तर रक्त सांडलं तर 15 मिनिटात महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, असेही ते म्हणाले.




