Thursday, May 14, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ३१ जानेवारी २०२६ - टोकाची असहिष्णूता

संपादकीय : ३१ जानेवारी २०२६ – टोकाची असहिष्णूता

सामाजिक असहिष्णुतेमुळे माणसांची मने किती खोलवर गढुळली जातात याच्या अस्वस्थकारक घटनांची संख्या वाढत आहे. एकदा का विधिनिषेध-विवेक संपवला, नैतिकतेला सोडचिट्ठी दिली की माणसे वाट्टेल ते बरळू लागतात. मृत्यूचे भांडवल केले जाते. कुटुंबातील सदस्य ट्रोल केले जातात. महिलेचे विश्व उद्ध्वस्त करणार्‍या बलात्काराला जाहीर कार्यक्रमात झळाळी दिली जाते. पण त्यात कोणालाही गैर वाटत नाही. अश्लाघ्य वक्तव्याचा, ट्रोलिंगचा जाब विचारावा असे गर्दीतील एकालाही वाटत नाही. उलट माणसेच टाळ्या वाजवून, प्रतिसाद देऊन, समाजमाध्यमांवर विकृत मनोवृत्तीची तळी उचलतात हे जास्त धक्कादायक आहे.

- Advertisement -

व्यक्तीच्या मृत्यूबरोबर तिच्याशी असलेले वैरदेखील संपते अशा आशयाचे एक संस्कृत सुभाषित आहे. कुटुंबीयाचा मृत्यू इतर सदस्यांना कोलमडून टाकणारा असतो. भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा असतो, याचाच विसर लोकांना का पडत चालला असावा? अजितदादांंच्या मृत्यूला काही तास देखील उलटले नव्हते तोच त्यांच्या साधनसंपत्तीची पंचाईत काहींना पडली. अनेकांनी त्यातही राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला. राजकारणात बोलभांडांची संख्या कमी नाही. संधी मिळेल तेव्हा नेते एकमेकांवर आगपाखड करतात, कुरघोडी करतात. पण तीच वक्तव्ये शोधून शोधून ती समाजमाध्यमांंवर पुन्हा टाकली जात आहेत. पण त्या माणसांचे चेहरे उघड करता करता अजितदादांंच्या व्यक्तिमत्वाला विनाकारण बोल लावले जातात याचे भान देखील माणसे विसरली असावीत का? दुर्दैवाने राजकीय नेत्याच्या मृत्यूला अनेक पदर असतात. त्याचे कुटुंब-आप्तस्वकीय तर कोलमडून पडलेले असतातच; पण त्यांच्यावर प्रेम करणारी सामान्य माणसे देखील दुःखात बुडतात. अंतिम निरोप देण्यासाठी राष्ट्रीय व्यक्तिमत्वांसह हजारो माणसे जमतात. ही परिस्थिती सांभाळण्याचा भार कोणाला तरी दुःख बाजूला सारून उचलावा लागतो. जसा तो सुप्रिया सुळेंनी उचलला असावा. त्यावरूनही त्यांना बोल लावले गेले.

राजकीय वैर समजण्यासारसारखे असते. पण त्यासाठी बलात्काराला बढावा दिला जावा? सामाजिक सहिष्णुता, माणुसकी, सहवेदना, संवेदना ही मूल्ये इतकी रसातळाला चालली असावीत का? द्वेष, मत्सर, वैर, भेदाभेद या मूल्यांनाही पुरून उरत चालले असावेत का? माफी हा शब्द देखील गुळगुळीत करून टाकला आहे. वाद झाला की माफी मागून त्यावर पडदा टाकला जातो. बलात्कारावर बोलणारी सामाजिक कार्यकर्ती देखील त्याला अपवाद नाही. असहिष्णुता सहन करणे अंगवळणी पडत चालले असावे का? माणसे कशानेच अस्वस्थ होत नसतील का? ही परिस्थिती बदलावी असेही कोणाला वाटत नसेल का? माणसांची मने दगड बनणे यापेक्षा वेगळे असू शकेल का? हे प्रश्न संवेदनशील माणसांना अस्वस्थ करणारेच आहेत. व्यापक स्तरावर सामाजिकता आणि मानवी मूल्ये रसातळाला जाणे परवडणारे नाहीच. त्यामुळे माणसे माणसाशी माणसासम वागणे का विसरत चालली असावीत याची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याची जबाबदारी विविध घटकांना म्हणजेच व्यापक अर्थाने समाजाला घ्यावी लागेल. त्यात राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका मोलाची ठरू शकेल.

सगळ्या प्रकारच्या भेदाभेदांचे राजकारण हीच त्यांची ओळख बनत चालली आहे. राजकीय स्वार्थासाठी सगळ्या प्रकारचा कट्टरतावाद जोपासला जाताना, जातीधर्म पणाला लावले जाताना आढळतात. यामुळे सामाजिक मनामनात कडवटपणा वाढत जाणे स्वाभाविकच. तोच मग वैयक्तिक पातळीवर देखील अनुभवाला येऊ लागतो. असे होणे म्हणजे विवेकाला सोडचिट्ठीच. ती दिली गेली की कशाचाच विधिनिषेध उरत नाही. उपरोक्त घटना ही त्याची उदाहरणे ठरू शकतील. याचा विचार राजकीय पक्ष करतील ही अपेक्षा सद्यस्थितीत गैरलागू ठरण्याचीच शक्यता जास्त. अर्थात, या सगळ्याला बळी न पडणे ही माणसांची देखील जबाबदारी आहे. त्यासाठी किमान अभ्यास-चिंतन ही पहिली अट ठरू शकेल. घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची किमान माहिती सर्वांंना असायला हवी. मानवी मूल्ये, चिकित्सक वृत्ती, तर्कनिष्ठता यांचे संस्कार अजाणत्या वयापासून केले जायला हवेत. जाणते असे विविध प्रकारचे उपाय सुचवून शकतील. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊ शकतील. कारण सामाजिक सौहार्द, सहिष्णुता, मानवता जपण्यासाठी सामूहिक प्रयत्न अपरिहार्य आहेत.

ताज्या बातम्या

Kerala CM : केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला; काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर...

0
नवी दिल्ली | New Delhi नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections) भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीत यश मिळाले होते. तसेच...