आपल्याच देशबांधवांना स्टुपिड म्हणजे मूर्ख म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरणारे जे उद्योग चालवले आहेत, ते पाहता ते स्वत:च मूर्खशिरोमणी या खास पदवीस पात्र असल्याचे म्हटले तर त्यांचे मोजके समर्थक वगळता कोणी आक्षेप घेणार नाही. इराणवर इस्त्रायलच्या साथीने हल्ला केल्यापश्चात सर्व बाजूंनी कोंडीत सापडल्यानंतरही आणि हळूहळू मित्रराष्ट्रे कमी होत जात असतानाही स्वत:ला जगातील सर्वात मोठी सत्ता मानणार्या अमेरिकेच्या इतिहासात शनिवारचा दिवस विद्यमान राष्ट्रप्रमुखाविरुद्ध पाऊण कोटींहून जास्त देशवासीयांनी निदर्शने करण्यासाठी लक्षात राहील.
त्या देशातील पन्नास राज्यातल्या तेहतीसशे शहरांमध्ये चौकाचौकांत जमून लोकांनी ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्याचा आणि त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा अतिशय शेलक्या भाषेत निषेध केला. ट्रम्प प्रशासनातील अधिकार्यांनी आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रवक्त्यांनी या आंदोलनामागे अतिडाव्या संघटनांना मिळणारा निधी असल्याची व त्यावर गुजराण करणार्या काही माध्यमांचा यात हात असल्याची उलटी टीका केली आहे. अशा वागण्याला मराठीत ‘… उलट्या बोंबा’ असा एक शब्दप्रयोग वापरला जातो. तो येथे चपखल बसतो. स्वत: ट्रम्प यांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणारे मूर्ख असल्याचे म्हटले आहे. एखाद्या महासत्तेचा प्रमुख या थराला जाऊन बोलत असेल तर एकूणच जागतिक शांततेपेक्षाही त्या देशाच्याच भवितव्याची चिंता वाटल्याशिवाय राहत नाही. पण अमेरिकेला पुन्हा महान बनवूया या घोषणेला भुलून ट्रम्पना राष्ट्राध्यक्षपदी बसवणारी अमेरिकन जनताच यास जबाबदार असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजेशाही नको, लोकशाही नको असा उद्घोष करणार्या नो किंग्ज आंदोलनाचा हा तिसरा आणि सर्वात मोठा टप्पा होता.
या आंदोलनांमध्ये सहभागी होणार्या अमेरिकनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याआधीच्या आंदोलनात पन्नास लाख लोक सामील झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, ताज्या आंदोलनात ८५ लाख लोक सहभागी झाल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ही संख्या एक कोटी असण्याची शक्यता आहे. इराणमधीलराजवट उलथून टाकण्यास निघालेल्या ट्रम्प यांचे स्वत:चेच स्थान त्यांच्या देशात धोक्यात आल्याचे या निदर्शनांवरून दिसत आहे. इस्त्रायलच्या नादी लागून इराणवर आक्रमण करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय आता त्यांच्यावरच उलटला आहे. अशा कोंडीत सापडलेल्या कोणत्याही परिपक्व आणि संयमी नेत्याने युद्धविरामासाठी प्रयत्न केले असते; परंतु ट्रम्प यांच्यासारख्या बेमुर्वतखोर व थिल्लर व्यक्तीकडून तशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. शिवाय हा मनुष्य अत्यंत खोटारडा आणि विश्वासघातकी असल्याचेही वारंवार सिद्ध होत आहे. एकीकडे ते इराण चर्चेच्या टेबलवर येण्यास तयार असल्याचे सांगत आहेत आणि दुसरीकडे इराणचा सर्वात मोठा तेलसाठा असलेल्या खुर्ग या बेटावर कब्जा करण्याचे मनसुबे रचत आहेत.
अमेरिकन सैन्य त्या बेटावर उतरवण्याची योजना आखत आहेत. २७ फेब्रुवारीला संभाव्य युद्ध टाळण्यासाठी बोलणी करून दुसर्याच दिवशी हल्ला करणार्या ट्रम्प यांच्यावर इराणचा विश्वास तरी कसा बसणार? इराणमध्ये आता सर्वोच्च नेता बनण्यास कोणीही तयार नाही, मला तसा प्रस्ताव आला होता; परंतु मी तो स्वीकारला नाही, असे हे महाशय म्हणतात आणि त्यांचे समर्थक हसत हसत टाळ्या वाजवतात. जगातील सर्वात प्रगत राष्ट्रातील जनतेचे एवढे अध:पतन! ट्रम्प यांच्या या चाळ्यांमुळेच बहुधा, परवाच्या आंदोलनात पुट डाऊन द क्राऊन, क्लाऊन-विदुषका, मुकुट खाली उतरव, असे फलक लोकांनी हाती घेतले होते. संतापजनक बाब म्हणजे, ट्रम्प यांनी या विरोधकांवर विष्ठा फेकण्याचा कृत्रिम बुद्धिमत्तानिर्मित व्हिडिओही पोस्ट केला होता! यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता वेगाने घसरत आहे. पुराणमतवादी व ग्रामीण जनता हा ट्रम्प यांचा मुख्य आधार होता. तोही त्यांच्याबद्दल नाराजी आहे.
रॉबर्ट डी निरो यांच्यासारखे अभिनेते, ब्रूस स्प्रिंगस्टीन व जोन बाएझ यांच्यासारखे कलावंतही या आंदोलनाचे कौतुक करत आहेत. ट्रम्प यांच्याविरुद्धची संतापाची भावना अमेरिकेबाहेरही पसरत आहे. रोम, पॅरिस, बर्लिनसारख्या शहरांत लोक त्यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, संतुलन बिघडलेल्या या माणसाला सद्बुद्धी सुचेल का, हाच आज जगासमोरचा प्रश्न आहे.





