Thursday, June 18, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ४ नोव्हेंबर २०२५ - त्यांनी करून दाखवले!

संपादकीय : ४ नोव्हेंबर २०२५ – त्यांनी करून दाखवले!

भारतीय क्रिकेट महिला संघाने इतिहास रचला. विश्वचषकावर पहिल्यांदाच देशाचे नाव कोरले. महिला क्रिकेटने या सामन्याच्या निमित्ताने अनेक रोमांचकारी क्षण कदाचित पहिल्यांदाचअनुभवले असतील. कदाचित पहिल्यांदाच पुरुष आणि महिला क्रिकेट सामन्यांमधील गर्दीची दरी प्रेक्षकांनीच मिटवली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी स्टेडियम पहिल्यांदाच खचाखच भरले होते. कोट्यवधी लोक ओटीटीवर सामना बघत होते. स्वतः जय शहा, अंबानी परिवार उपस्थित होते. यामुळे सामना अधिकच लक्षवेधी ठरला. त्याला चमक प्राप्त झाली.

डायना एडलजी, अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा असे ज्येष्ठ-श्रेष्ठ खेळाडू स्टेडियममध्ये उपस्थित होते. खेळाडूंना प्रेरणा देत होते. विजयानंतर रोहितने सुटकेचा नि:श्वास सोडला असणार. नोव्हेंबर २०२३ मधील पराभवाच्या वेदना महिला संघाच्या विजयाने मिटवल्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. बीसीसीआयनेही खेळाडूंचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. रोमांचक स्थितीत झालेल्या अंतिम सामन्याने अनेक प्रेरणादायी बदलांच्या भविष्यकालीन आशा पल्लवित केल्या. खराब कामगिरी आणि वैयक्तिक कारणांमुळे मूळ संघात वगळण्यात आलेल्याशफाली वर्मा हिला उपांत्य फेरीपासून संघात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिनेही कसर सोडली नाही. संधीचे सोने केले. बदली खेळाडू हा शिक्का कायमचा पुसून टाकला. अशा युवा खेळाडू, ज्या पुढची अनेक वर्षे संघाला विजयी करण्याची क्षमता राखून आहेत, त्यांचा परिचय देशाला झाला.

- Advertisement -

या विजयाने महिला क्रिकेटला नव्याने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्यासाठी आर्थिक पाठबळाची दारे उघडून दिली. विजयाची आर्थिक रक्कम तर संघाला मिळणार आहेच; पण बीसीसीआयने त्याव्यतिरिक्त एकावन्न कोटींचे पारितोषिक जाहीर केले आहे. अन्यथा, काही वर्षांपूर्वीपर्यंत महिला खेळाडूंना मैदानाबाहेर किती प्रकारच्या उणिवांशी आणि भेदभावांशी लढावे लागायचे हे झुलनसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीतून सांगितले आहे. क्रिकेट खेळायला मिळण्यासाठी सर्व प्रकारचे ओझे त्यांनाच वाहावे लागायचे. पण त्या हरल्या नाहीत. कदर नसतानाही खेळत राहणे सोपे नसते. त्या खेळत राहिल्या म्हणूनच अनेकजणी त्या वाटेच्या प्रवासी बनल्या. भारतीय महिला संघांचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी आणि संघाने पाहिलेले स्वप्न एकच होते. खेळाडूंच्या आयुष्यातील एका संधीचे महत्व मुजुमदार यांच्याइतके कदाचित कोणालाच समजू शकणार नाही. क्षमता असूनही आणि ‘प्रति तेंडुलकर’ असे टोपणनाव मिळूनही भारतीय संघाची दारे त्यांना उघडली नाहीत.

देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू बघतो. त्यांनीही ते पाहिले होते, जे त्यांनी महिला संघाच्या विजयाच्या माध्यमातून साध्य केले. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांचा चरणस्पर्श करत आदर व्यक्त केला तो पुरेसा बोलका ठरावा. मैदानात अंतिम सामना सुरू असताना प्रेक्षकांना ‘चक दे इंडिया’ आठवत असणार. मुजुमदार यांची कथा त्यापेक्षा वेगळी नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरचेदेखील असेच काहीसे आहे. तिच्या कारकिर्दीत तिने कायमच दर्जेदार खेळ केला. स्वतःला नेहमीच सिद्ध केले. किमान चार वेळा विश्वचषक सामने खेळले. पण विजयाने हुलकावणी दिली. अनेकवेळा टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही. पण विश्वचषक स्पर्धेत तिच्याच समर्थ नेतृत्वाखाली संघाने अनेक विक्रम रचले. सलग तीन सामने हरले तरी खचून न जाता जबरदस्त पुनरागमन केले आणि इतिहास रचला. संघातील सगळ्याच खेळाडूंनी सारखेच योगदान दिले. त्यांच्या पालकांचेही पांग फेडले.

विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्जच्या वडिलांचा भावनावेग प्रातिनिधिक आहे. पराभव झाल्यानंतर कसे वाटते ते सगळेच जाणून आहेत. पण जिंकल्यानंतर कसे वाटते त्याच्याच प्रतीक्षेत सगळे आहेत, अशा भावना हरमनने सामन्यापूर्वी व्यक्त केल्या होत्या. त्याचा प्रत्यय संपूर्ण स्टेडियमला आणि देशाला त्यांनी आणून दिला. विजयानंतर देशात फटायांचा दणदणाट झाला. क्रिकेट रसिकांना, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ या ओळी नक्कीच आठवल्या असतील. आता विजयाची सवय लावायची आहे, असे हरमन म्हणाली. ती सवय रसिकांना लागली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...