Friday, September 20, 2024
Homeअग्रलेखदै.‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिवस - संपादकीय : ४ सप्टेंबर २०२४ -...

दै.‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिवस – संपादकीय : ४ सप्टेंबर २०२४ – या जगण्यावर शतदा प्रेम करावे

आज चार सप्टेंबर 2024. दै. ‘देशदूत’ चा 55 वा वर्धापन दिवस. समाजाचे, चळवळीचे आणि नाशिकच्या मातीतील दैनिक हीच ‘देशदूत’ची ओळख. हा दिवस साजरा करतांना समाजातील वातावरण उत्साहवर्धक-सकारात्मक पण मन काहीसे विचलित करणारे देखील दिसते आहे. त्याचा धांडोळा घेता, माणसाचे माणूसपण हरवलेय का इथपर्यंतचा विचार मनात चमकून जातो.

- Advertisement -

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसे अस्थिरता अनुभवत आहेत. करोनानंतर माणसांना कशाचीच शाश्वती वाटेनाशी झाली आहे. त्या अस्थिरतेसोबत व अशाश्वतेसोबत जगतांना माणसे अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहेत. परिणामी माणूस सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावतोय का अशी संभ्रमावस्था आहे. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक ते स्वास्थ्याच्या स्तरापर्यंत तीच अस्थिरता अनुभवास येते. माणसाला त्याच्याच आयुष्याची शाश्वती वाटावी आणि त्याचा प्रवास पुन्हा एकदा स्थिरतेकडे सुरु व्हावा हाच विचार ‘देशदूत’ प्राधान्याने करतो.

वर्तमानपत्र, डिजिटल आणि साजमाध्यमांवर वार्तांकन आणि मजकूर निर्माणाच्या मुळाशी नेहमी तोच दुर्ष्टीकोन ठेवला जातो. तोच वर्धापनदिवस विशेषांक आरोग्यमचा विषय आहे. स्वास्थ्याचे आशादायी चित्र माणसाच्या मनात निर्माण व्हावे माणसाचा मनात व्हावे, असाच हा प्रयत्न आहे. अनारोग्याच्या भीतीच्या सावटाखाली माणसे आहेत. एक प्रकारची भीती माणसांची मने व्यापून असल्याचे आढळते. योग्य माहिती ती भीती नक्कीच कमी करू शकेल. योग्य माहितीच माणसाच्या जगण्याला सकारात्मक दिशा प्रदान करू शकेल.

योग्य माहिती उपलब्ध करून देणे हे वर्तमानपत्र म्हणून आमचे कर्तव्य आहे. वर्धापन दिवसाचा निमित्ताने स्वास्थ्याकडे बहुआयामी दृष्टिकोनातून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या पॅथी, त्यांचे तज्ज्ञ, त्या पॅथींमधील समज-गैरसमज, त्यांच्या पद्धती, त्यात सुरु असलेली आणि होऊ घातलेली संशोधने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वेगवेगळे आजार, औषध निर्मिती, जेनेरिक औषधे याचा उहापोह त्यात केला आहे.

तज्ज्ञांच्या 21 मुलाखतींचे व्हिडीओ देशदूतच्या यू ट्यूब चॅनलवर प्रसारित केले आहेत. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपुलकी, प्रेम, आदर, जिव्हाळा, समाधानी वृत्ती, आनंद हे मनुष्यत्वाचे काही पैलू. ज्यांची जोपासना माणसाला चित्त आणि वृत्तीने स्थिर राहण्यास मदत करते. वर्तमानात आनंदी राहिलात तर उद्या निश्चित चांगला उगवणार आहे यावरचा विश्वास वाढण्यास ‘आरोग्यम’ निश्चित मदत करेल. त्यातून माणसे ‘या जगण्यावर शतदा प्रेम’ करायला शिकतील याची आम्हाला खात्री आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या