आज ४ सप्टेंबर २०२५! दैनिक ‘देशदूत’चा ५६ वा वर्धापनदिन! ‘नाशिकच्या मातीतील दैनिक’ ही ओळख आता मनामनांवर ठसली आहे. जिल्ह्याच्या विकासात ‘देशदूत’ नेहमीच अग्रणी राहिला आहे. वर्धापनदिनानिमित्ताने भविष्याचा वेध घेताना भूतकाळातील वाटचालीचे अवलोकनही केले जाते. तसे करताना ‘देशदूत’ने रोवलेले अनेक मैलाचे दगड नजरेच्या टप्प्यात सहज येतात.
जिल्ह्याच्या राजकारणाचा पट नव्याने रचण्यात ‘देशदूत’ने मोलाची भूमिका बजावली. ते करताना जनहित साधण्याचे माध्यम आहोत, याचा कधीही विसर पडू दिला नाही. अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निराकरण चळवळींचा ‘देशदूत’ नेहमीच केंद्रबिंदू आणि आधार राहिला. यापुढेही राहील. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी ‘देशदूत’ला हक्काचे व्यासपीठ मानतात. त्यांचे प्रश्न धसास लावण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. समाजासमोर आदर्श नाहीत, अशी तक्रार अनेक जण करतात. ‘देशदूत’ने मात्र नेहमीच पर्याय देण्याचा, समाजासमोर आदर्श उभे करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. समाजोद्धारासाठी झटणार्या कानाकोपर्यातील माणसांचा शोध ‘देशदूत’ नेहमीच घेत आला आहे.
कधी हा शोध ‘गुणवंतांच्या’ रूपात तर कधी ‘तेजस’ किंवा ‘कर्मयोगिनी’ पुरस्कारांच्या रूपाने समाजासमोर ठेवला जातो. असामान्य कामगिरी करणार्या गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. उत्तम कामगिरी करणार्या युवा उद्योजकांना ‘तेजस’ पुरस्काराने सन्मानित केले. कर्तृत्ववान महिलांना ‘कर्मयोगिनी’ पुरस्काराने सन्मानित केले. कधी गुरुजन आणि शिक्षकांच्या कामगिरीची दखल घेतली. यावर्षी एका पुरस्कार सोहळ्याने थेट विदेशात झेप घेतली. पुरस्कारार्थींना व्हिएतनामसारख्या प्रगतिशील देशात पुरस्कार प्रदान केले. काळाबरोबर पुरस्कारांचे नाव बदलत गेले, पण गाभा मात्र तोच आहे. समाजाच्या भल्यासाठी लोक आपापल्या परीने काम करीत असतात. त्याची दखल घेऊन त्यांच्या कर्तृत्वाची गाथा लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना प्रेरणा देणे हे “देशदूत’ आपले कर्तव्यच मानतो. समाजाशी संवाद साधणार्या उपक्रमांची यादी भली मोठी होऊ शकेल.
शिवाजीराव भोसले, प्रा. रामभाऊ शेवाळकर, हभप धुंडा महाराज देगलूरकर, अण्णा हजारे, उज्ज्वल निकम, गो. रा. खैरनार, सिंधुताई सपकाळ अशा अनेक मान्यवरांच्या विचारांचा लाभ लोकांना करून देण्यासाठी त्यांना नाशिकला आमंत्रित केले. संवाद कट्टा, वर्धापनदिन विशेषांक, तालुके आणि छोट्या छोट्या गावांना भेटी देऊन केलेले वृत्तांकन, दिवाळी विशेष, विविध पुरवण्या, विशेष मुलाखती; एक ना अनेक! २०२७ मध्ये सिहंस्थ होणार आहे. नाशिकच्या चौफेर विकासाची संधी हा सोहळा उपलब्ध करून देतो. त्यामुळे यावर्षी वर्धापन विशेषांकासाठी ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची’ हा विषय निवडून औचित्य साधण्यात आले आहे. जिल्ह्यातील मान्यवरांच्या मुलाखती आणि अभ्यासपूर्ण लेखांतून सिंहस्थामुळे होणार्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नाशिकचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व, गोदावरी नदी, रामकुंड हीच नाशिकची जगभरातील मुख्य ओळख आहे. विकास करताना नाशिकच्या मूळ गाभ्याला धक्का लागू नये, असे ‘देशदूत’ मानतो. आज प्रसिद्ध झालेला विशेषांक त्याचेच द्योतक आहे. काळाबरोबर ‘देशदूत’ही बदलत आहे. काळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. डिजिटल बदलही ‘देशदूत’ने सहज स्वीकारले. ‘देशदूत’ची डिजिटल आवृत्ती देश-विदेशात वाचली जाते. परदेशस्थ भारतीय त्याची आवर्जून दखल घेतात. तरुणाईला हे बदल भावतात.
आवृत्ती छापील असो अथवा डिजिटल; स्थानिकांना (व्होकल फॉर लोकल) त्यासाठीच प्राधान्य दिले जाते. त्यांच्या छोट्या-छोट्या समस्या सोडवण्याला अग्रक्रम दिला जातो. त्यासाठी ‘देशदूत’चे प्रतिनिधी सातत्याने जिल्ह्याचा दौरा करतात. वास्तववादी वृत्तांकन करतात. नागरिक आणि प्रशासन यांंचा मेळ बसवून समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हे कर्तव्य मानतात. मूल्याधिष्ठित पत्रकारिता आणि वाचकांशी निष्ठा हा ‘देशदूत’चा वारसा आहे. हा वसा सामूहिकतेच्या बळावर नक्कीच सुफळ संपूर्ण होईल. ‘देशदूत’चे वाचकांच्या मनातील स्थान कायमच अबाधित राहील.





