तामिळनाडूच्या राजकारणाने गेल्या सहा दशकांपासून एक ठराविक साचा जोपासला होता. १९६७ नंतर या राज्याने ‘द्रविडीयन’ विचारधारेच्या पलीकडे जाऊन कधी विचार केला नाही. अण्णा दुराई, एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी तामिळ मातीवर आपल्या कर्तृत्वाचा जो ठसा उमटवला, त्यातून बाहेर पडणे कोणत्याही तिसर्या शक्तीला आजवर शय झाले नव्हते. मात्र, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी या परंपरेला केवळ छेदच दिला नाही, तर प्रस्थापित राजकारणाचे सारे बुरुज ढासळून टाकले आहेत. सुपरस्टार विजय आणि त्यांच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी जन्मलेल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने मिळवलेले यश हे केवळ एका अभिनेत्याचे यश नसून, ते प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जनतेने पुकारलेले बंड आहे.
तामिळनाडूमध्ये चित्रपट आणि राजकारण यांचे नाते अतूट आहे. मात्र, चित्रपट सृष्टीतील लोकप्रियतेचे रूपांतर मतपेटीत करणे सर्वांनाच जमले नाही. शिवाजी गणेशन यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या कमल हसन, रजनीकांत यांच्यापर्यंत अनेकांनी या वाटेवर पाऊल ठेवले; पण त्यांना राजकीय यशाने हुलकावणी दिली. कमल हासन व रजनीकांत यांनी अगदी प्रारंभीच कच खाल्ल्याने थलपती विजय यांनी नाहक धाडस केले आहे की काय, असा अंदाज प्रांरभी तथाकथित राजकीय निरीक्षक मांडत होते. स्वत: विजय यांनी मात्र आपले इप्सित ध्यानात ठेवत आपली राजकीय खेळी अत्यंत संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने खेळली. ‘विजय मक्कल इय्यकम’ या आपल्या फॅन लबचे त्यांनी शिस्तबद्ध राजकीय संघटनेत रूपांतर केले हीच भविष्यातील विजयाची पायाभरणी ठरली. एका जनसंपर्क रॅलीत चेंगराचेंगरी झाली. मात्र, थलपती डगमगले नाहीत. ‘जनतेचा सेवक म्हणून मैदानात’ ही त्यांची भूमिका मतदारांना, विशेषतः तरुण वर्गाला भावली.
प्रस्थापित द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला विजय यांच्या रूपाने एक ‘स्वच्छ’ आणि ‘नवा’ पर्याय दिसला, हेच या विजयाचे मुख्य गमक आहे. निवडणूक जिंकण्यासाठी विजय यांनी ज्या घोषणा केल्या, त्या अत्यंत लोकानुनयी आणि धाडसी आहेत. गरीब कुटुंबातील नववधूंना आठ ग्रॅम सोने, महिलांना दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत, पाच लाख नवीन सरकारी नोकर्या आणि बेरोजगारांना दरमहा ४,००० रुपयांचा भत्ता यांसारख्या आश्वासनांनी मतदारांना भुरळ घातली. मात्र, सत्तेची खुर्ची मिळवणे जितके कठीण होते, त्यापेक्षा जास्त कठीण ही आश्वासने पूर्ण करणे असणार आहे. तामिळनाडूवर आधीच कर्जाचा मोठा डोंगर आहे. अशा स्थितीत या ‘मोफत’ योजनांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण आणि वाढणारी महागाई, हे विजय यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान असेल. केवळ भावनिक साद घालून निवडणुका जिंकता येतात; पण प्रशासन चालवण्यासाठी आर्थिक शिस्त आणि दूरदृष्टीची गरज असते.
या निकालाने केवळ तामिळनाडूच नव्हे, तर देशातील प्रादेशिक पक्षांना मोठा धडा दिला आहे. घराणेशाही, भ्रष्टाचाराचे आरोप आणि केंद्राशी असलेल्या संघर्षात अडकलेले मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सरकार जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे, जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची झालेली शकले आणि नेतृत्वाचा अभाव याचा पूर्ण फायदा विजय यांनी उचलला. मात्र, आता सत्तेच्या उंबरठ्यावर असलेल्या टीव्हीकेला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस किंवा इतर छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. ‘स्वबळा’ची भाषा करणार्या विजय यांना युतीचे राजकारण कसे जमते, यावर त्यांच्या सरकारचे स्थैर्य अवलंबून असेल. तामिळनाडूच्या जनतेने विजय यांना ‘नवा जननायक’ म्हणून स्वीकारले आहे. रुपेरी पडद्यावर अशय वाटणार्या गोष्टी सहज साध्य करणार्या ‘थलपती’ला आता प्रत्यक्ष प्रशासनाच्या ‘कठोर’ वास्तवाचा सामना करावा लागणार आहे. जनतेने मोठ्या आशेने त्यांच्या हाती सत्ता सोपवली आहे.
या अपेक्षांच्या आकाशात भरारी मारताना विजय यांचे पाय जमिनीवर राहणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन, पारदर्शक प्रशासन आणि आश्वासनांची पूर्ती या त्रिसूत्रीवरच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे भवितव्य ठरेल. शेवटी, निवडणूक हा एक ‘चित्रपट’ असू शकतो, पण प्रशासन ही ‘मालिका’ असते, जिचा प्रत्येक भाग जनतेच्या कसोटीवर उतरणे अनिवार्य असते. तामिळनाडूच्या या नव्या प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विजय यांनी मिळवलेला हा विजय केवळ सत्तेचा विजय न ठरता, तो तामिळ जनतेच्या विश्वासाचा विजय ठरावा हीच अपेक्षा!





