Tuesday, December 3, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ७ नोव्हेंबर २०२४ - मनुष्य जनम अनमोल रे, इसे मिट्टीमे...

संपादकीय : ७ नोव्हेंबर २०२४ – मनुष्य जनम अनमोल रे, इसे मिट्टीमे मत रोल रे

मनुष्य जन्म एकदाच मिळतो असे मानले जाते. परिणामी ते जीवन माणसाने कसे जगावे याचे मार्गदर्शन संतांनी करून ठेवले आहे. तथापि माणसाने माणसाचे आयुष्य किडामुंगीपेक्षाही स्वस्त करून टाकले असावे. हकनाक मरण ओढवून घेताना माणसे आढळतात. क्षुल्लक कारणावरून मित्र एकमेकांचा जीव घेतात. अनेक आत्महत्या करतात. नियमभंग करून एखाद्या वाहनचालकाचा जीव जाण्याचे कारण ठरतात.

मद्यधुंद वाहनचालक रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडतात. बेपर्वा वाहन चालवून इतरांच्या अकाली मृत्यूचे कारण ठरतात. बंगळुरूमधील नुकत्याच घडलेल्या एका घटनेत मद्य घेतलेल्या चार मित्रांनी एका मित्राशी पैज लावली. त्याला रिक्षा घेऊन देण्याच्या बदल्यात त्याने फटाके लावलेल्या पेटीवर बसून दाखवावे अशी ती पैज होती. जसे ठरले तसे घडले आणि पेटीवर बसलेला तो तरुण फटाक्यांच्या स्फोटामुळे प्राणाला मुकला. माणसाला माणसाच्या आयुष्याची किंमत राहिलेली नसावी अशी शंका यावी अशा या घटना म्हणाव्या लागतील.

- Advertisement -

माणसे आयुष्याला का कंटाळली असावी? टोकाची निराशा, अस्वस्थता, चंचलता त्यांना का गाठत असावी? एकतर स्वतःचे आयुष्य संपवून टाकणारी किंवा दुसर्‍याला मारून टाकण्याची भावना त्यांच्यातील चांगुलपणावर मात करत असू शकेल का? करोना नंतरच्या काळात माणसांचे आयुष्य संघर्षमय बनले आहे. दोन वेळचे घास पोटी पडत नसल्याचा अनुभव हजारो माणसे घेतात. पण जीव नष्ट करणे हे त्यावरचे उत्तर आहे हे लोकांनी कसे ठरवले? माणसे मनाने एकेकटी आणि आत्मकेंद्रित होत चालली असावीत का? कदाचित त्यामुळेच आव्हानांचा सामना करण्याची आणि मानव जन्माची किंमत कळण्याची क्षमता कमी होत चालली असावी. म्हणूनच एकमेकांच्या जीवावर उठत असावीत का? माणसांना काय झाले आहे? आपण काय करतो, का करतो, त्याचे परिणाम त्यांच्या आणि इतरांच्याही आयुष्यावर काय होतील याचा जराही विचार माणसे करत नसावीत.

बुद्धी गहाण ठेवल्यासारखा वेडाचार माणसे करतात. बंगळुरू घटनेतील पैज लावणार्‍यांनीही विचार केला नाही म्हणून फटाक्याच्या डब्यावर बसणार्‍याने देखील तो करू नये? अनाठायी धाडस करून, एकमेकांच्या जीवावर उठून माणसांना काय सिद्ध करायचे असावे? अपयश, निराशा, संकटे आयुष्याचा एक भाग असतात. ते प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येतात. धीराने त्यांचा सामना करणाराला कधी ना कधी त्याचे फळ मिळते. याची जाणीव जाणत्यांनी करून देण्याची आवश्यकता आहे. ‘मनुष्य जनम अनमोल रे, इसे मिट्टीमे मत रोल रे’या भजनात संत कबीरही तेच सांगतात. एकमेकांना समजून घेण्याची, सुखदुःख वाटून घेण्याची, विचार करण्याची, आव्हाने पेलण्याची अंगभूत क्षमता फक्त माणसाकडेच आहे याचा विसर पडू नये इतकीच अपेक्षा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या