Friday, September 20, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ९ ऑगस्ट २०२४ - सामूहिक जबाबदारी

संपादकीय : ९ ऑगस्ट २०२४ – सामूहिक जबाबदारी

पावसाळी पर्यटनस्थळी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या पालकांनी सरकारला दोषी ठरवून नुकसान भरपाईची मागणी केल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. पुण्यात मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात ही घटना घडली. त्या परिसरात माहिती आणि धोक्याचा इशारा देणारे फलक लावले गेलेले नाहीत. त्यामुळे मुले पाण्यात उतरली आणि मुलाचा मृत्यू झाला, असा दावा त्याच्या पालकांनी केला आहे.

- Advertisement -

त्यांनी सरकारला नोटीस बजावल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला आणि ती सरकारची जबाबदारी आहे’ असे नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीसची दखल सरकार घेईल का? पालकांना काय उत्तर मिळेल यावर आगामी काळात कदाचित प्रकाश पडू शकेल. तथापि सुरक्षित पर्यटनस्थळे ही प्रामुख्याने सरकारची जबाबदारी आहे हे मात्र सरकारी सूत्रांनाही मान्य करावे लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकेल.

पर्यटनस्थळांचे डिजिटलायझेशन, गर्दीचे नियंत्रण, दर दिवशी किती पर्यटकांनी भेट द्यावी याचे मार्गदर्शन लोकांना एका क्लिकवर देणे शक्य आहे. तथापि त्याऐवजी बंदी घालण्याकडे कल वाढला असावा का? बंदी घालून सरकार जबाबदारी टाळू शकेल का? वास्तविक पर्यटन क्षेत्र कुशल आणि अकुशल रोजगारनिर्मिती करते. आगामी वर्षात या क्षेत्रात सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून सुमारे 18 लाख रोजगारनिर्मितीची सरकारची अपेक्षा असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी माध्यमांना अनेकदा सांगितले आहे.

अपघात होतात म्हणून पर्यटन स्थळांवर बंदी घालून सरकार धोरणालाच हरताळ फासत असावे का? बंदी घालून रोजगारनिर्मिती कशी होऊ शकेल? पर्यटनस्थळे सुरक्षित केली तरच धोरण अमलात आणणे शक्य होऊ शकेल हे तर सरकारही जाणून असावे. सूचना आणि धोक्याचा इशारे देणारे फलक लावणे, बंदोबस्त ठेवणे हे त्यापैकी काही उपाय. मुलाच्या अकाली जाण्याचा पालकांना भावनिक धक्का बसणेही स्वाभाविकच. त्यामुळे त्यांच्या कृतीमागचा उद्देशही समजण्यासारखा आहे. तथापि अनेक पर्यटकांचा अतिउत्साहदेखील दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतो, हेही लक्षात घेतले जायला हवे.

अनेक ठिकाणी सूचना फलक लावलेले असतात. धोक्याचे इशारे दिलेले असतात. पण किती पर्यटक ते मनावर घेतात? सूचना अमलात आणतात? अनेकदा पर्यटकांचे त्याच्या विपरीतच वर्तन आढळते. पावसाचा जोर ओसरल्यावर सरकारने काही पर्यटनस्थळांवरची बंदी उठवल्याचे माध्यमांत प्रसिद्ध झाले आणि तिथे अलोट गर्दी झाल्याची छायाचित्रे माध्यमांत झळकली. ते अतिउत्साहाचेच द्योतक नाही का? तेव्हा यासंदर्भात ज्यांच्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव संबंधित घटकांना यानिमित्ताने तरी होईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या