श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दत्तनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकू, कत्ती व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दत्तनगर येथील आशा सुधाकर ब्राम्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा नातू हितेश ब्राम्हणे याचे पूर्वी काही युवकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, अलीकडे त्याने त्यांच्याशी संपर्क व सहवास कमी केल्याने संबंधित युवक त्याच्यावर नाराज होते. याच कारणावरून ते वारंवार त्याला त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दि. 19 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजता आशा ब्राम्हणे, नातू हितेश ब्राम्हणे तसेच त्याचे मित्र कार्तिक केदारी व यश जगताप हे दत्त मंदिराजवळील एका गिरणीत दळण दळण्यासाठी गेले होते. सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ते तेथून निघत असताना चिमण्या बागुल, साई जाधव, सुजीत कोळगे, गौरव घडसी, रितेश आढाव, धनराज जाधव आणि युवराज जाधव हे तेथे आले. त्यांनी हितेशला आमच्यासोबत का राहत नाही? असा जाब विचारत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीपासून बचाव करण्यासाठी हितेश तेथून पळण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून मनोरमा बिल्डिंगसमोर गाठल्याचा आरोप आहे. तेथे त्याच्यावर चाकू, कत्ती व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. फिर्यादी आशा ब्राम्हणे यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र भीतीमुळे परिसरातील कोणीही पुढे आले नसल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादीनुसार, चिमण्या बागुल याने हितेशच्या शरीरावर चाकूने वार केला, तर साई जाधव याने कत्तीने त्याच्या पायावर घाव घातला. रितेश आढाव याने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या हितेशला कुटुंबीयांनी तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला लोणी येथील पीएमटी रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दत्तनगर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून चिमण्या बागुल, साई जाधव, सुजित कोळगे, गौरव घडसी, रितेश आढाव, धनराज जाधव, युवराज जाधव अशा सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 109(1), 126(2), 189(2), 189(4), 191(3), 190, 115(2), 351(2), 352 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.




