Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबी.डी. भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय रद्द

बी.डी. भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय रद्द

शिक्षणमंत्री भुसेंचे आश्वासन; आंदोलन स्थगित

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील बी.डी. भालेकर शाळा पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह तयार करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता, त्या विरुध्द शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसह विविध राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी शाळेच्या जागी शाळाच हवी. या मागणीसाठी आंदोलन सुरू केले, हळूहळू त्याला चांगला पाठींबा मिळत गेला. तर आज आंदोलनाच्या १६ व्या दिवशी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपले प्रतिनिधी पाठवून आंदोलकांशी चर्चा करुन शाळेच्या ठिकाणी अद्यावत शाळाच बांधण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थागित करण्यात आले. जनमताच्या रेट्यापुढे अखेर शासन नमले आहे. दरम्यान शाळेसाठी ‘देशदूत’ ने पुढाकार घेत विषय लावून धरला होता.

आज दुपारी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना पाठवून फोनवर आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. यावेळी फोनच्या स्पीकरवरून आंदोलकांशी ना. भुसे यांनी संवाद साधत शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय रद्द झाल्याची अधिकृत माहिती दिली व बी. डी. भालेकर शाळा पुन्हा त्याच ठिकाणी अद्यावत स्वरूपात सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे असे स्पष्ट आश्वासन दिले.

यापुढे मनपा, नगरविकास विभाग आणि शिक्षण विभागाकडून सर्व पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी बोरस्ते यांनी समितीला दिले. तसेच आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. समितीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, दिलेल्या शब्दाप्रमाणे तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा आहे. समितीच्या आंदोलनामुळेच विश्रामगृहाचा प्रस्ताव रद्द झाला असून हा आंदोलनाचा विजय आहे, अशी भावना व्यक्त केली.

आता शाळा जागेवरच पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे. नाशिककर, माजी विद्यार्थी, परिसरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाशिकची अस्मिता असलेली बी डी भालेकर मराठी शाळा वाचवण्यात यश आल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. तर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी राजू देसले, दीपक डोके, तल्हा शेख, मनोहर पगारे, डॉ. ठकसेन गोराणे, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, पद्माकर इंगळे, योगेश कापसे,अमर गांगुर्डे, आबा डोके, प्रवीण पगारे, संजय चौरिया, गजू घोडके, गौतम पवार, विजू तेजाळे, दत्तात्रया कोठावदे आदींचा सहभाग होता.

नगरविकास विभागाकडून शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नाशिकसाठी सिंहस्थ निधी मिळणार असून, त्यातूनही शाळेसाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच समितीची बैठक लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करून देणार.
दादा भुसे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

ना. दादा भुसे यांच्यासह नाशिक भेटीदरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही बी डी भालेकर शाळेसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. परिसरात सर्वसामान्य व गरजू कुटुंबे राहतात; त्यांच्या मुलांचे शिक्षण अबाधित राहण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. भालेकर शाळा नाशिकची ओळख असून त्याला पूसू देणार नाही.
अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना, नाशिक

शासनाकडून जो आदेश येणार त्या प्रमाणे आम्ही काम करणार. शासनाने शाळेसाठी निधी दिला तर भालेकर शाळेच्या जागी शाळाच बांधणार. विश्रामगृहाच विचार दुसर्‍या ठिकाणी करु. या पुर्वी देखील मी हे बोलले होते.
मनिषा खत्री, आयुक्त तथा प्रशासक, मनपा नाशिक

‘देशदूत’चा पुढाकार
शहरातील बी.डी. भालेकर शाळेचा मुद्दा ‘देशदूत’ने सतत लावून धरला. कोण होते भालेकर पासून ही जागा कोणी दान केली व कशी शाळा उभी राहिली, त्याचे महत्व व शाळेच्या जागी शाळाच हवी. याबाबत सतत पाठपुरवा करण्यात आला.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...