Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय

राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय

क्रीडा विभागाचा शासन निर्णय जारी

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

यंदाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. क्रीडा विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय घेतला. या उत्सवाची लोकप्रियता आणि गोविंदांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोविंदांच्या संख्येत १० हजाराने वाढ करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू ,कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अथवा दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास गोविंदाला पाच लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळेल. कायम अपूर्ण अपंगत्व आल्यास विमा पॉलिसीत नमूद केलेल्या टक्केवारीनुसार विमा संरक्षण मिळणार आहे. अपघातात प्रत्यक्षात झालेला रुग्णालयीन खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास विमा संरक्षण अनुज्ञेय असणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

गोविंदांची नोंदणी आवश्यक
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने सराव आणि प्रशिक्षण घेतलेल्या तसेच निर्धारित वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या आणि प्रत्यक्ष दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांची नोंदणी करून त्यांची माहिती तपासून प्रमाणित करणे आवश्यक आहे. ही माहिती क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाकडे सादर केल्यानंतर नोंदणीकृत गोविंदांच्या संख्येनुसार विमा हप्त्याची रक्कम अदा केली जाणार आहे.

आयोजकांवर सुरक्षेची जबाबदारी
दहीहंडी आयोजक संस्थांना स्थानिक प्रशासन आणि संबंधित प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. न्यायालय, शासन, स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सहभागी गोविंदांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहणार आहे. अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

शरद

मूलभूत अधिकारावर…विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, उत्सवाच्या नावाखाली…

0
पुणे | Puneगणेशोत्सवादरम्यान डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला करण्यात आला....