Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमूलभूत अधिकारावर...विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, उत्सवाच्या नावाखाली...

मूलभूत अधिकारावर…विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, उत्सवाच्या नावाखाली…

पुणे | Pune
गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला करण्यात आला. बापट हे माध्यमांशी संवाद साधत असतानाच एका व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया देत बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

- Advertisement -

‘विद्यानंद बापटांना मी ओळखत नाही, पण त्यांचा मुद्दा योग्य’
शरद पवार यांनी विद्यानंद बापट यांना वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, बापट यांनी उपस्थित केलेला ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.“विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. मात्र, ते जे म्हणत आहेत त्याला अर्थ आहे. कोणताही उत्सव हा सुखद असला पाहिजे. कोणतेही सण-उत्सव लोकांना आनंद देणारे पाहिजेत. डीजेचे आवाज आणि रस्त्यावरील कार्यक्रम यामुळे कोणत्याही सणाचं किंवा उत्सवाचं गांभीर्य कमी होतं,” असे पवार यांनी म्हटले.

दै.’देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन सोहळा

गणेशोत्सव ही महाराष्ट्राची मोठी परंपरा असून उत्सव साजरा करण्याला विरोध नसावा, मात्र उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनीप्रदूषणासारख्या बाबींवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे नाही, अशी भूमिका त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाली.

‘कुणीतरी मत व्यक्त केलं म्हणून हल्ला करणं हा लोकशाहीवर हल्ला’
विद्यानंद बापट यांनी डीजेच्या वापराबाबत आपली भूमिका मांडली म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावर शरद पवार यांनी थेट लोकशाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला. “त्यामुळे यावर जर कोणीतरी मत व्यक्त केलं आणि मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला होतो, हे माझ्या मते लोकशाहीवर आणि लोकांच्या मूलभूत अधिकारावर हल्ला आहे,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र एखाद्या व्यक्तीने एखाद्या सामाजिक विषयावर भूमिका मांडल्यामुळे त्याच्यावर शारीरिक हल्ला करणे योग्य नाही, असा संदेश पवारांच्या प्रतिक्रियेतून देण्यात आला आहे.

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हे थांबले पाहिजे. अन्यथा यंत्रणेने सक्तीने कारवाई केली पाहिजे,” असा इशाराही पवार यांनी दिला.

ताज्या बातम्या