अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar
देहरे (ता. नगर) येथील 30 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली. त्या महिलेस लव जिहादच्या माध्यमातून फूस लावून पळविल्याची चर्चा गावात सर्वत्र सुरू झाली. रविवारी दिवसभर गावातील वातावरण संतप्त होत आंदोलन करण्यात आले. सायंकाळी आ. संग्राम जगताप यांनी गावात भेट दिली. दरम्यान पीडित महिला अकोले येथे सापडली असून एमआयडीसी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
देहरे गावामधून एक विवाहित महिला शुक्रवारी संध्याकाळी मुलासाठी जत्रेमधून खेळणी विकत आणते, असे सांगत घरातून बाहेर पडली आणि गायब झाली. रात्री उशिरापर्यंत महिला न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला व एमआयडीसी पोलीस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली. या महिलेस एका विशिष्ट समाजाच्या मुलांसोबत जाताना काहींनी पाहिले. त्यानुसार लोकांनी शोध सुरू केला असता जवळीलच गावातील हॉटेलमध्ये ते मुक्कामास असल्याचे गावातील लोकांच्या निदर्शनास आले. हा लव जिहादचा प्रकार असल्याने गावातील वातावरण तापले. गावात ग्रामसभा घेण्यात आली. गावातील अतिक्रमणे काढण्याबरोबरच गावात काही नवीन विशिष्ट समाजाच्या लोकांची संख्या काही दिवसात वाढत असून अनेक बाहेरचे लोक या ठिकाणी स्थायिक झाल्याचे गावकरी सांगतात. हे लोक कोठून आले, त्याचे आधार कार्ड, त्यांचे मूळ ठिकाण शोधण्यात यावे व या लोकांना गावातून बाहेर काढण्यात यावे, गावातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, असे ठराव करण्यात आले.
दरम्यान आ. जगताप यांनी या ठिकाणी भेट दिली. ज्या कुटुंबातील महिला होती त्या पीडित कुटुंबातील लोकांना पोलिस संरक्षण मिळावे, तसेच गावातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बेपत्ता महिलेचा शोध घेण्यास एमआयडीसी पोलिसांना रविवारी यश आले. अकोले येथून महिलेला ताब्यात घेतले. अकोले पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. पीडित महिलेने फिर्याद दिल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.