नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly) ७० जागांसाठी बुधवार (दि.५) फेब्रुवारी रोजी मतदान (Voting) पार पडले होते. यात ९४.६ लाख मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. त्यामुळे यंदा दिल्लीत या तिन्ही पक्षांत तिरंगी लढत झाली. त्यानंतर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असता त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या कलांनुसार भाजप (BJP) ७० जागांपैकी ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) २९ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे आप आणि काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कलांनुसार दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता आहे. तर अशातच आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आप आणि काँग्रेसला डिवचले आहे.
दरम्यान, भाजपा आघाडीवर गेल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर एक मिम शेअर केले आहे. महाभारतातील एका साधूचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जी भर के लडो, समाप्त करतो एक दुसरे को”, असा संवाद मिममधील साधू बोलताना दिसत आहेत. तर ओमर अब्दुल्ला यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘और लडो आपस मै’, असे म्हणत ओमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत एकत्र न लढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे.