नाशिक | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची फसवणूक करून बेकायदेशीर व्हीआयपी दर्शनाचा जो गोरखधंदा सुरू होता, त्यातील एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य एजंट वसंत मुतर्डक याच्या बँक खात्याची तपासणी केली असता, तो बेरोजगार असूनही त्याच्या खात्यातून लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटचे गांभीर्य लक्षात घेता, एसआयटीने अधिक तपासासाठी त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.
फिर्यादी आणि त्यांचे मित्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रांगेत उभे असताना, संशयित गोटीराम पेहरे याने त्यांना गाठले. दर्शन रांगेत ४-५ तास लागतील असे सांगून, तीन हजार रुपयांत अवघ्या १० मिनिटांत व्हीआयपी दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखविले. मंदिर देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत पावती न देता, भाविकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली. या टोळीने भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून समांतर यंत्रणा चालवल्याचे उघड झाले.
दरम्यान, संशयित एजंट वसंत मुतर्डक हा कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नाही. मात्र, त्याच्या गेल्या एका वर्षाच्या बँक स्टेटमेंटची पाहणी केली असता, त्यात ऑनलाइन आणि रोख स्वरूपात तब्बल २५ लाख २७हजार ५२० रुपयांची रक्कम जमा झाल्याचे दिसून आले आहे. हा पैसा कोठून आला आणि या रॅकेटचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आता एसआयटी करत आहेत. मुतर्डक विरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे. गुजरात राज्यातील सुरत येथील भाविक चिराग दालिया यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद असून त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे.
न्यायालयाचा दणका
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. पोलिसांनी सादर केलेला तपास अहवाल आणि बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार पाहता, न्यायालयाने संशयित वसंत मुतर्डक याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर इतर संशयितांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.





