नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादनादरम्यान महिलांना झालेल्या मारहाणीचे पडसाद आता जिल्हाधिकारी कार्यालयात उमटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने राऊतांनी तेथेच ठिय्या मांडला. यावेळी संजय राऊत यांनी प्रशासन आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
जिल्हाधिकारी भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याची भूमिका खासदार राऊत यांनी यावेळी घेतली होती. तब्बल एक तासांनंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कार्यालयात पोहोचले. यावेळी, या दोघांमध्ये नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरून चर्चा झाली. “तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुमच्या घरीही आई बहिणी असतील ना? हा कोणता नियम आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, हे बरोबर नाही. शिवसेनेने आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला तर आंदोलन शेवटपर्यंत जाईल, असा शब्दात संजय राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडसावले.
संजय राऊत यांनी यावेळी “आया-बहिणींचे कपडे फाडून रिंग रोडची जागा अधिग्रहीत करणार असाल तर नाशिककर षंढ झाले आहेत काय?” असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच बसून पत्रकारांशी बोलताना खा.राऊत म्हणाले की, शहराचा विकास व्हायलाच हवा, मात्र शेतकऱ्यांची घरे, उदरनिर्वाहाची शेती आणि सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करून विकास साधला जाणार असेल, तर तो अन्यायकारक आहे. “या नुकसानाची भरपाई काय? पोलिसांना पोलिसी कारवाईसाठी पाठवले आहे की नागरिकांवर दडपशाही करण्यासाठी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, “मी कधीही सरकारी कार्यालयात जात नाही, पण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सीता समान माता-भगिनींना घरात शिरून मारहाण केली जाते. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार आहे. कसले अधिकारी नेमले आहेत तुम्ही? जबरदस्तीने जमिनी घेऊ नका. मी पोलीस किंवा ईडीला घाबरत नाही. याला धमकी समजायची असेल तर खुशाल समजा,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
रिंग रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांबाबत सर्वपक्षीय चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “शहराचा विकास केवळ भाजपच करत आहे का? खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन निर्णय व्हायला हवा होता. मुख्यमंत्र्यांना अशा दंडेलीच्या कारवायाचे आदेश देताना काळजी आहे का? धर्मध्वजा अपवित्र करण्याचे काम यातून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.”
काय आहे प्रकरण?
नाशिक रिंग रोडच्या 365 हेक्टर जमीन संपादनासाठी गेल्या शनिवारी मातोरी आणि मुंगसरे येथे मोजणी प्रक्रिया सुरू होती. यावेळी ग्रामस्थांनी विरोध केला असता, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या घरात शिरून महिलांना फरफटत बाहेर काढले आणि मारहाण केली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे.





